शेती व पिण्याच्या शाश्वत पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात
Featured

शेती व पिण्याच्या शाश्वत पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Sarvmat Digital

आ. आशुतोष काळे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन केली मागणी

कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा पर्जन्यछायेखाली येत असल्यामुळे संपूर्ण मतदारसंघात नेहमीच पाऊस कमी पडतो. मागील काही वर्षांपासून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचे हक्काचे पाणी जायकवाडीला जात आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला असून कोपरगाव शहरासह मतदार संघातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनुत्तरित आहे.

आपण व्यक्तिगत लक्ष घालून कोपरगाव मतदारसंघासाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.

मुंबई येथे आ.आशुतोष काळे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कार्यकर्त्यांसह भेट घेतली व त्यांना या आशयाचे निवेदन दिले. तसेच याप्रश्नी शरद पवार यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी आ. काळे व कार्यकर्त्यांनी केली. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पिकाच्या व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अवलोकन केली. शरद पवार यांनीही सर्व गोष्टी समजावून घेतल्या.
यावेळी शरद पवार यांना दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव मतदारसंघातील शेतकर्‍यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे.

गोदावरी खोरे हे अतीतुटीचे असूनही नगर, नाशिकच्या धरणांतून अनेकवेळा जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्यामुळे अहमदनगर, नाशिक व मराठवाडा असा प्रादेशिक वाद निर्माण झालेला आहे. हा वाद मिटवण्यासाठी व गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे पाणी पूर्ववत मिळण्यासाठी पावसाळ्यात पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे 80 टीएमसीपेक्षा जास्त पाणी पूर्वेला गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी राज्य शासनाला तातडीने निधीची उपलब्धता करण्यासाठी योग्य त्या सूचना कराव्यात, असे आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राज्य शासनाने नुकतीच शेतकर्‍यांना कोणत्याही अटी, शर्तीविना सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. पावसाळ्यात पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे 80 टीएमसीपेक्षा जास्त पाणी पूर्वेला गोदावरी खोर्‍यात वळविण्यासंदर्भात आ. आशुतोष काळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या नागपूर अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी पवारांच्या घेतलेल्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com