Friday, April 26, 2024
Homeनगरमहिनाभरात जिल्ह्यात 37 अल्पवयीन मुलींचे अपहरण

महिनाभरात जिल्ह्यात 37 अल्पवयीन मुलींचे अपहरण

अहमदनगर (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यामध्ये जानेवारीत 37 अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यात आले असल्याचे समोर आले आहे. या 37 मुलीपैकी 18 मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून हे प्रमाण 50 टक्केच आहे. या प्रकारामुळे पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. याच कालावधीत आठ मुलांचे देखील अपहरण झाल्याचे गुन्हे जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. या आठ पैकी तीन मुलांचा शोध लागला आहे.

प्रियकराने दिलेले लग्नाचे आमिष, भूलथापांना बळी पडून अल्पवयीन मुली घर सोडत असल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलीला किंवा मुलाला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात कलम 363 अंतर्गत फिर्याद दाखल होते. चार महिन्यांत स्थानिक पोलिसांना या मुलांचा शोध घेता आला नाही, तर ही केस अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे येते. जानेवारीमध्ये जिल्ह्यातील 45 मुलामुलींचे अपहरण झाले असल्याची नोंद अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे झाली आहे. या 45 पैकी 37 मुली असून 18 मुलींचा शोध संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घेतला आहे. त्यांना त्यांच्या पालकांकडे देण्यात आले आहे. तर आठ मुलांचे अपहरण करण्यात आले असून तीन मुुले सापडले आहे. असे असले तरी एका महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुली पळवून नेल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जानेवारीमध्ये अपहरण झालेल्या 19 मुलींचा व पाच मुलांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

- Advertisement -

अल्पवयीन मुलामुलींवर सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. सोशल मीडिया, चित्रपट, मालिका पाहून तसे जीवन जगण्याचे स्वप्न अल्पवयीन मुलीकडून पाहिले जात आहे. पौंगडावस्थेतील मुलांकडे आकर्षित होऊन अल्पवयीन मुली घर सोडत आहे. घर सोडल्यानंतर देखील या मुलींचे जीवन सुखात जात नसल्याने त्यांच्या आयुष्याची वाताहत झाल्याचे अनेक उदाहरणे समाजात आहेत. जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलिस ठाणे हद्दीतून सार्वाधिक चार, पारनेर, पाथर्डी, कोतवाली, एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतून प्रत्येकी तीन मुलींचे अपहरण झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. श्रीरामपूरच्या एका मुलींचा शोध पोलिसांनी लावला आहे. तर, तीन मुलींचा शोध पोलीस घेत आहे.

पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन
अल्पवयीन मुलेमुली घर सोडत असलेल्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पालक वर्गांच्या दृष्टिकोनातून ही चिंतेची बाब आहे. घरामध्ये असलेल्या पाल्याकडे लक्ष देणे, मोबाईलचा अतिवापरापासून दूर ठेवणे, आपला मुलगा काय करतो याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. नवनवीन चित्रपट, मालिका तसेच समाजमाध्यमावरील वेगळेगळे व्हिडिओ, बदलते जीवन यामुळे किशोरवयीन मुलेमुली लवकर एकमेकांच्या प्रेमात पडतात. यामुळे चित्रपटातील जीवनमान प्रत्यक्षात जगण्यासाठी पालकांपासून मुले दूर जाऊ लागली आहेत. या घटनांमध्ये वाढ झाल्याने पालकांनी मुलांची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेण्याचे आवाहन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या