आठवणी – डॉ. भदन्त आनंद यांची जळगाव भेट !
Featured

आठवणी – डॉ. भदन्त आनंद यांची जळगाव भेट !

Balvant Gaikwad

अनिल पाटील
मो. 9307039648

जागतिक कीर्तीचे बौद्ध धर्मगुरू, प्रख्यात विचारवंत, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रमुख डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन 1985 मध्ये जळगाव येथे पद्मालय विश्रामगृहात आले होते. मी त्यांना तेथे जाऊन भेटलो होतो. भदन्त आनंद यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली होती. अनेक विषयांवर त्यांची चर्चा होत असे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाचे वेळी भदन्त त्यांच्या जवळच होते. अशा या महान विभूतीला भेटण्याची आणि चर्चा करण्याची संधी मला केवळ पत्रकारितेमुळे मिळाली, याचा मला आजही आनंद आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकाचा हिंदी अनुवाद बाबासाहेब अनुमतीनेच त्यांनी केला होता. त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्या समवेत त्यांनी कार्य केले होते. पुरुषोत्तमदास टंडन यांच्या समवेत त्यांनी स्वतंत्र आंदोलनात भाग घेतला होता.

पंजाब प्रांतातील मोहाली जवळील सोहन हे त्यांचे जन्मगाव. 5 जानेवारी 1905 रोजी त्यांचा जन्म झाला होता. खत्री परिवारातील लाला रामशरणदास हे त्यांचे वडील अंबाला येथे शिक्षक होते. विश्वनाथ हे भन्तेजींचे पूर्वीचे नाव होते. राहुल संकृत्यायन यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी 1928 मध्ये दीक्षा घेतली. श्रीलंकेत बौद्ध धम्म स्वीकारला. तेथील विश्वविद्यालयात हिंदी विभागप्रमुख म्हणून काम केले.

धुळे येथील प्राच्य विद्या पंडित कॉ. शरद पाटील यांना ते भेटत असत. सत्यशोधक मार्क्सवादी या मासिकाचे प्रकाशन भदन्त आनंद यांच्या हस्ते झाले होते. 10 मार्च 1982 ला नाशिकच्या प. सा. नाट्यगृहात म्हणजे परशुराम सायखेडकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. जळगाव येथील भेटीत त्यांनी बुद्धधम्म आणि मार्क्सवाद या दोन चिंतन परंपरा असून त्या बुद्धिप्रामाण्यवादी असल्याचे सांगितले होते. 22 जून 1988 मध्ये नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये ते बुद्धवासी झाले. जळगाव पद्मालय विश्रामगृहात झालेली भेट आणि त्यांच्या समवेत केलेली चर्चा मला त्या काळात खूपच प्रेरणादायी ठरली.

Deshdoot
www.deshdoot.com