दोन हजार 685 सभासद अक्रियाशील !

jalgaon-digital
3 Min Read

जिल्हा बँक : अंतिम मतदारयादीपूर्वी क्रियाशीलतेचे पुरावे करावे लागणार सादर

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक पूर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. यात विकास सोसायट्यांचे ठराव घेण्यात येत असून बँकेच्या पातळीवर बँकेच्या एकूण सहा हजार 44 सभासदांपैकी 2 हजार 685 सभासद हे अक्रियाशील सभासद असल्याचे समोर आले आहे. आता या अक्रियाशील सभासदांना प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात नाव न आल्यास पुराव्यासह त्यांची क्रियाशीलता सिद्ध करावी लागणार आहे. अन्यथा हे अक्रियाशील सभासद मतदानाला मुकणार आहेत.

पुढील वर्षी साधारणपणे एप्रिल महिन्यात जिल्हा बँकेच्या 21 संचालकांच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने निवडणूक पूर्व प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून बँकेचे सभासद असणार्‍या विविध विकास सेवा सोसायट्यांचे ठराव मागविण्यात येत आहे. हे ठराव आल्यानंतर प्रारूप मतदारयादी तयार करून ती प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवून त्यानंतर अंतिम मतदारयादी तयार करून ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने एकएक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.

बँकेच्या सेवा सोसायट्या मतदारसंघात 14 तालुक्यांत 1 हजार 440 सभासद आहेत. प्रक्रिया मतदारसंघात शेती आणि शेती पूरकमध्ये 2 हजार 69 सभासद असून बिगरशेती मतदारसंघात 2 हजार 661 मतदार आहेत. या मतदारातून क्रियाशील आणि अक्रियाशील मतदार वेगळे करून त्यांची यादी जिल्हा उपनिबंधक यांना बँकेकडून सादर करण्यात येणार आहे. बॅँकेच्या प्राथमिक माहितीनूसार 6 हजार 44 सभासदांपैकी 3 हजार 469 हे क्रियाशील तर 2 हजार 685 सभासद हे अक्रियाशिल सभासद आहेत.

बँकेचे 14 तालुक्यात विकास सोसायट्यांचे 1 हजार 440 सभासद आहेत. यात 1 हजार 389 हे क्रियाशील सभासद आहेत. या मतदारसंघात सेवा सोसायटी थकबाकीत असल्यास संचालक मंडळाऐवजी थकबाकीदार नसणार्‍या सभासदाच्या नावाचा ठराव मतदार म्हणून पाठविता येवू शकतो. शेती-पूरक प्रक्रिया मतदारसंघात 2 हजार 69 सभासद असून यात 766 क्रियाशील तर 1 हजार 303 अक्रियाशील सभासद आहेत.

बिगरेशती मतदारसंघात 2 हजार 661 सभासद असून यात 1 हजार 304 क्रियाशील तर 1 हजार 370 हे अक्रियाशील सभासद आहेत. या मतदारसंघात नागरी बँका, ग्रामीण नागरी बँका, पतसंस्था, मजूर संस्था, आद्योगिक संस्था, आर्थिक संस्था, अर्बन बँका, पगारदार संस्था, ग्राहक संस्था, ग्राम उद्योग संस्था, स्वयंरोजगार संस्था, व्यक्तीगत संस्था यांचा समावेश आहे.

बँंकेच्या निवडणुकीत मतदानात सहभाग घेण्यासाठी संबंधीत संस्थांना क्रियाशील राहणे आवश्यक असून यासाठी बँकेचा पाच हजारांचा शेअर्स असणे, पाच वर्षात एकादा तरी वार्षिक सभेला हजर असणे आवश्यक आहेत. अन्यथा त्यांच्या गैरहजेरीला संचालक मंडळाने मंजूरी देणे गरजेचे आहे. संबंधीत संस्था थकबाकीत नसणे अथवा अवसायनात निघालेली नसली पाहिज. तिची नोंदणी रद्द झालेली नसलेली पाहिजे. हे निकर्ष पूर्ण नसल्यास संबंधीत संस्था हा अक्रियाशील ठरणार असून त्यांना मतदानापासून वंचित राहवे लागणार आहे.

शेतीपूरक आणि बिगरशेती या मतदारसंघांत मोठ्या प्रमाणत अक्रियाशील सभासद आढळले असले तरी हा आकडा कमी होण्याची शक्यता बँकेकडून व्यक्त करण्यात आली आहे. या दोन्ही प्रवर्गातील मतदारांनी पुरावा सादर केल्यानंतर त्यांना क्रियाशील ठरविता येणार आहे. बँक पातळीवर एकूण सहा हजार 44 सभासदांपैकी दोन हजार 685 सभासद अक्रियाशील असले तरी त्यांचे ठराव घेण्यात येणार असून याबाबतच अंतिम निर्णय जिल्हा उपनिबंधक कार्यालय घेणार आहेस.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *