महाविकास आघाडीकडून झेडपीच्या सत्तेसाठी ‘चाल’
Featured

महाविकास आघाडीकडून झेडपीच्या सत्तेसाठी ‘चाल’

Sarvmat Digital

जिल्हास्तरावर काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांना कबूल || सेनेचे सदस्य उद्या श्रेष्ठींच्या भेटीसाठी मुुंबईला

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील महाविकास आघाडीकडून चाल करण्यात येत आहे. यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा स्तरावरील नेत्यांच्या आणि पदाधिकार्‍यांच्या बैठका पूर्ण झाल्या असून आता ते पक्षश्रेष्ठींच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीतील शिवसेनेचे सदस्य आणि पदाधिकारी सोमवारी मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत. त्यांचा अंतिम आदेशनुसार पुढील वाटचाल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यातील महाविकासआघाडी नगर जिल्हा परिषदेत अस्तित्वात आल्यास भाजपसाठी ही धोक्याची घंटी ठरणार आहे. जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणारा 37 सदस्य बळाचा आकडा पार करणे महाविकासआघाडीला शक्य होणार आहे. यामुळे ऐनवेळी भाजप काय खेळी करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदासाठी इच्छुक असणार्‍यांचे अर्ज मागविलेले आहेत. नेत्यांच्या पक्षांतरामुळे पक्षातील 19 पैकी 3 सदस्य भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. यामुळे उर्वरित 16 पैकी कितींनी पदासाठी अर्ज केला, याबाबत पक्षाकडून गोपनियता पाळण्यात येत आहे.

विद्यमान परिस्थितीत जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. यामुळे राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदावर दावा करण्यात येत आहे. आता उर्वरित पदांमध्ये उपाध्यक्षपद आणि चार विषय समिती सभापतीपदांची महाविकासआघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि नेवासा तालुक्यातील क्रांतीकारी शेतकरी पक्षात वाटणी होण्याची शक्यता आहे. महिला बालकल्याण आणि समाज कल्याण समिती या दोन समित्या अडचणीच्या ठरणार आहेत. ज्या पक्षाच्या वाट्याला या समित्या जाणार आहेत. त्यांच्याकडे पात्र उमदेवार असणे महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीमध्ये अध्यक्षपदासाठी पाच इच्छुक
अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असून राष्ट्रवादीकडून पाचजण अध्यक्षपदासाठी इच्छूक आहे. हे पद महिला सर्वसाधारण पदासाठी असून त्यासाठी विद्यमान उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, प्रभावती ढाकणे, सुवर्णा जगताप यांच्यासह भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या सुनीता भांगरे आणि शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या राणी लंके देखील अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

हे आठ दिवस महत्वाचे
सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून बैठका, भेटी-गाठी सुरू होणार आहेत. यामुळे 23 ते 30 डिसेंबर हा काळ जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी महत्वाचा ठरणार आहे. या काळात कोण कोणावर जाळे फेकणार आणि कोण कोणाच्या गळाला लागणार हे समोर येणार आहे. त्यात आता विधानसभेचे अधिवेशन संपले असून नेते मंडळी त्यातून बाहेर पडली आहेत. यामुळे मिशन झेडपीला वेग येणार आहे.

भाजपचा सावध पवित्रा

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून सावध पवित्रा घेण्यात येत आहे. यासाठी निष्ठावान सदस्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून राज्यातील सत्ता हातातून गेली असली तरी जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचे मनसुबे उधळण्यासाठी काही जिल्हा परिषद सदस्यांना हेरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यापूर्वी नगर जिल्हा परिषद सदस्य बळ हाती नसताना विखे कुटुंबाने अध्यक्षपद खेचून आणलेले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार का, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com