फडणवीस यांची पत्रकार परिषद आभासी ; महाविकासआघाडीचं प्रत्युत्तर
Featured

फडणवीस यांची पत्रकार परिषद आभासी ; महाविकासआघाडीचं प्रत्युत्तर

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई –  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आभासी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला आम्ही प्रत्यक्ष उत्तर देत आहोत असा टोला परिवहन मंत्री अनिल परब यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत लगावला. केंद्र सरकारने राज्याला आतापर्यंत 28 हजार 104 कोटींचा निधी दिला अशी माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यावेळी फडणवीसांनी आकडेवारी जाहीर केली होती. त्या पार्श्‍वभभमीवर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. राज्याला 28 हजार 104 कोटीं नाही तर प्रत्यक्षात केवळ 6600 कोटी रुपयेच मदत मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पत्रकार परिषद घेतली त्याला आम्ही उत्तर देतोय. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समोर गोष्टी ठेवून असं चित्र उभं केले की केंद्र सरकार भरघोस मदत देऊनसुद्धा महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत आहे. लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून सत्य परिस्थिती समोर मांडतोय, अशी माहिती राज्य सरकारतर्फे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. विरोधीपक्षाने उणीदुणी काढण्यापेक्षा केंद्राकडून मदत आणून दिली असती, तर आम्ही अभिनंदन केलं असतं. फडणवीसांनी उणीधुणी काढण्यापेक्षा त्यांनी खरचं काही मदत केली असती. तर आम्ही त्यांचे कौतुक केले असते. फडणवीसांच्या दाव्याप्रमाणे 1750 कोटी रुपयांचा गहू महाराष्ट्राला मिळालेला नाही. 122 कोटी स्थलांतरित मजुरांसाठी दिलेले नाही, कारण ऑर्डर चार दिवसापूर्वी निघाली आणि मजूर आधीच गावी पोहोचलेले आहेत. विधवा, दिव्यांग आणि इतरांना 116 कोटी दिले असा दावा फडणवीसांनी केला. पण या योजनेत फक्त 20 टक्के रक्कम केंद्र सरकार देते. महाराष्ट्र सरकारने उर्वरित 80 टक्के म्हणजे 1210 कोटी दिले, हे त्यांनी सोयीस्करपणे सांगितले नाही. महाराष्ट्रातून 600 श्रमिक ट्रेन सुटल्या. या सर्व ट्रेनचा खर्च महाराष्ट्र सरकारने दिला आहे. कोणत्याही श्रमिकाकडून पैसे घेतलेले नाही. श्रमिकांना ट्रेनने सोडण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकारने केला. मजुरांकडून एकही पैसा घेतला नाही. तसेच एका ट्रेनला 50 लाख खर्च कुठून येतो याचा हिशोब विरोधीपक्षकडून घ्या, असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.
एसटी बेस्टच्या वतीने आम्ही मजूरांना पोहोचवत होतो. मात्र वारंवार ते गोंधळ निर्माण करतात. महाराष्ट्रापेक्षा लहान गुजरात राज्याला जास्त ट्रेन दिल्या. राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं. महाराष्ट्र सरकारचे हक्काचे 18 हजार कोटी हे 2019-20 चे पैसे आम्हाला मिळालेले नाही. आम्हाला, हक्काचे पैसे जरी मिळाले तरी पुरेसे आहेत. कापूस, धान, चणा-मका अशा शेतमाल खरेदीसाठी 9 हजार कोटी दिल्याचा दावा खोटा आहे. महात्मा फुले योजनेअंतर्गत आम्ही 12 हजार कोटी वाटले. मजुरांच्या छावण्यांसाठी 1611 कोटी दिल्याचे सांगितले, दरवर्षी 4600 कोटी आपत्ती व्यवस्थापनाचे मिळतात, हे त्यातलेच पैसे, वेगळे दिलेले नाही,
EPFO चे पैसे अद्याप आलेले नाहीत. केंद्राकडून 2 लाख 71 हजार 500 कोटी महाराष्ट्राला मिळणार असं सांगितलं, पण हे आभासी पैसे, प्रत्यक्ष किती मिळणार याचा आमचाही अभ्यास आहे, असंही अनिल परब यांनी सांगितलं.

राज्यात सरकार एकत्रितपणे काम करतेय – थोरात
पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची भूमिका मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार सक्षमपणे आणि एकत्रितपणे काम करत आहे, असे महसूल मंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महटले आहे. विरोधी पक्षाकडून आम्ही सहकार्याची अपेक्षा केली होती, मात्र त्यांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. असं असलं तरी आम्ही आमची मानसिकता ढळू देणार नाही. महाराष्ट्र करोनामुक्त करून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊ, असे थोरात यांनी बजावून सांगितले.
मुंबईची अवस्था काळजी करण्यासारखी आहे, ही वस्तूस्थिती असली तरी त्यावर मात करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री स्वत: सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अत्यंत कमी कालावधीत सर्व सोयींनी सज्ज असं रुग्णालय उभारण्यात आलं आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्यानुसार व्यवस्था केली जात आहे. कोणाचीही गैरसोय होणार नाही हे पाहिले जात आहे. असे असताना विरोधी पक्ष जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला.

भाजप महाराष्ट्राचा मित्र की शत्रू? – जयंत पाटील
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र सरकार काहीच करत नसल्याचे सांगत चुकीचे चित्र निर्माण केले आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र बचाओ असे आंदोलन करुण राज्यात कोरोना विरुद्ध लढणार्‍या कर्मचार्‍यांचे खच्चीकरण केले असून भाजपा हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला पडला आहे असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. फडणवीस हे कोविड आणि करोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभे राहतील असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने तसं झालं नसल्याची टिकाही यावेळी केली. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली आकडेवारी चांगली आहे मात्र त्यात तथ्य नसल्याचे सांगत नुसती आकडेवारी सादर करण्यापेक्षा आम्हाला साथ द्या. तसं झालं तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरणार नाही असा टोलाही यावेळी ना. पाटील यांनी लगावला.

Deshdoot
www.deshdoot.com