भाजपकडून विधानपरिषदेसाठी मोहिते, पडळकर, गोपछेडे, दटके यांना उमेदवारी
Featured

भाजपकडून विधानपरिषदेसाठी मोहिते, पडळकर, गोपछेडे, दटके यांना उमेदवारी

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – विधान परिषदेसाठी भाजपकडून चार जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके, भाजपच्या मेडिकल सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछेडे या चौघांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि प्रभारी अरुण सिंह यांनी पत्रकाद्वारे चौघांच्या नावाची घोषणा केली.
उमेदवारांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजता विधानभवनात उमेदवारी अर्ज भरला. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

दरम्यान, पक्षाने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्या नावावर फुली मारली आहे. भाजपने शर्यतीत असलेल्या उत्सुक नेत्यांना धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले होते. तर गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढली होती. बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता.

याशिवाय नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि भाजपच्या मेडिकल सेलचे अध्यक्ष असलेले नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे. सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकासआघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील.

पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 21 तारखेलाच मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. 11 मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

Deshdoot
www.deshdoot.com