Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना संकटातही राजभवनावरून राजकीय शिमगा

कोरोना संकटातही राजभवनावरून राजकीय शिमगा

सार्वमत

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करण्याची  शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रलंबित ठेवल्याने, सध्या राज्यावर कोरोनाचे संकट असतानाही यावरून राजकीय शिमगा सुरू आहे. शिफारस करुन दहा दिवस झाले आहेत अद्याप राज्यपालांनी उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवर शिक्कामोर्तब केले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा खासदार संजय राऊत मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भात राज्यपालांनी केंद्राकडे सल्ला मागितला असल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी ट्विट करून हल्ला चढविला होता.

- Advertisement -

राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है! असे ट्विराऊत यांनी करून टिकास्त्र सोडले होते. त्याला माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी प्रतित्युत्तर दिले आहे. राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहित नाही काय? सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है! असा शब्दात राणे यांनी समाचार घेतला आहे. त

राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्यानुसार ते निर्णय घेतील. दबाव कशाला आणताय? लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना, मग आता लोकशाहीने वागा. पत्रपंडितांनी अकलेचे तुणतुणं वाजवण्याची काय गरज? राजभवनाच्या नावाने बोंबा मारायला शिमगा आहे का? असा टोला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे.

त्यानंतर संजय राऊत यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पुन्हा भाजपवर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार पाडण्याचे पत्ते जे कुणी पिसत असतील त्यांना मी शिवसेनेच्यावतीने इतकंच सांगू इच्छितो की, 27 मेनंतर सुद्धा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार असेल असे ते म्हणाले. मी काहीही वादग्रस्त ट्विट केलेलं नाही, मी माझं मत व्यक्त केलं. राजभवनाबाबत काल मी जुने संदर्भ वाचत होतो, त्यावेळी राजभवनातील गफलती आढळल्या. त्या भावनेतून मी व्यक्त झालो. महाराष्ट्राचे राज्यपाल सदगृहस्थ आहेत, सदाचारी, अनुभवी आहेत, त्यांना संघाचा प्रचंड अनुभव आहे, संघपरिवारात काम केलं आहे, महात्मा आहेत, त्यांच्यावरती कोणताही आक्षेप घेणार नाही. तुम्हाला वाटत असेल मी त्यासंदर्भात बोलेल, पण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत आणि त्यांना 27 मे पर्यंत एखाद्या सभागृहाचं सदस्य होणं गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर हे सरकार कोसळेल, किंवा अन्य काही गोष्टी घडतील, पण जे कोणी अशा समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न काही अड्ड्यांवर बसून करत आहेत., त्यापैकी एक अड्डा आपलं राजभवन होऊ नये, असं मी म्हणालो, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

राज्यात कोरोनाचे संकट उभे राहिले असताना राजकारणी मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र सध्या राज्यात पाहावयास मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या