आघाडीत बिघाडी ; बाळासाहेब थोरातांनी बोलून दाखवली खदखद!
Featured

आघाडीत बिघाडी ; बाळासाहेब थोरातांनी बोलून दाखवली खदखद!

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – महाराष्ट्रातील सरकारमधले आम्ही देखील घटकपक्ष आहोत. त्यामुळे आम्हालाही निर्णय प्रक्रियेत स्थान हवंय, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्याविषयी बाजू मांडणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. एका वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी देखील महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते. आता ना. थोरातांच्या वक्तव्यानंतर आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चांना पुष्टी मिळाली आहे.
दरम्यान राज्यात तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात होता. मात्र, सरकारमध्ये सारं काही आलबेल असल्याचेे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठामपणे सांगितलं होतं. पण बाळासाहेब थोरात यांच्या या भूमिकेमुळे आता आघाडीत मिठाचा खडा पडलाय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आम्ही देखील सरकारमधले घटकपक्ष आहोत. आमच्या काही मागण्या आहेत. त्या आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मांडणार आहोत. आमचा पक्ष म्हणून ज्या आमच्या मागण्या आहेत, त्या महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या आहेत. निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान हवं ही आमची मागणी आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर आघाडीतली बिघाडी पहिल्यांदाच जाहीरपणे समोर आली आहे.

काँग्रेसकडून दबावतंत्राचा वापर – काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांसह मंत्री आणि नेत्यांची आज बैठक झाली असून त्या बैठकीमध्ये या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित असल्याचे सांगण्यात येते. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिल्यामुळे काँग्रेसचा सत्तेत असलेला एक गट अजूनही असमाधानी असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, विधानपरिषदेतल्या राज्यपाल नियुक्त जागांची नियुक्ती आणि महामंडळांचं वाटप, यामध्ये अधिकचा वाटा मिळावा, यासाठी काँग्रेसकडून हे दबावतंत्र वापरलं जात असल्याची देखील चर्चा आहे.

Deshdoot
www.deshdoot.com