राणे म्हणतात ‘हे’ मुनगंटीवारांना जाऊन सांगा; राष्ट्रपती राजवटीवरून भाजपातच जुंपली
Featured

राणे म्हणतात ‘हे’ मुनगंटीवारांना जाऊन सांगा; राष्ट्रपती राजवटीवरून भाजपातच जुंपली

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – करोना व्हायरसमुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी केली होती. सोमवारी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली त्या दरम्यान त्यांनी ही मागणी केली.

करोना संकटाचा सामना करण्यास ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा असं ते म्हणाले होते. त्यानंतर भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ती राणे यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं सांगत पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी यावर भाष्य करत मी केलेली मागणी ही पक्षाची भूमिका आहे असं कधीही म्हणालो नाही हे मुनगंटीवारांना जाऊन सांगा, असं ते म्हणाले.

मी केलेली मागणी ही पक्षाची भूमिका आहे असं कधीही म्हणालो नाही हे मुनगंटीवारांना जाऊन सांगा. मी पक्षाचा महाराष्ट्राचा प्रमुख नाही. मी केलेली मागणी ही वैयक्तिकरित्या केलेली मागणी होती. महाराष्ट्रात करोनामुळे सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मृतांचा आकडा वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. हे सरकार करोना रुग्णांना वाचवण्यात असमर्थ ठरली आहे, असं राणे म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

लोकांना आज रुग्णालयात जागा मिळत नाही. चार तास एक रुग्ण रुग्णालयात बसून होता. त्याला दाखल करून घेतलं नाही. अखेर त्याचा तिकडेच मृत्यू झाला. अशा परिस्थितीत आम्ही काही बोलायचं नाही? जर मृतांची संख्या थांबली तर आम्ही या सरकारला चांगलं सरकारही म्हणू. परंतु मृतांची संख्या वाढतेय हे उघड्या डोळ्यांनी पाहणार्‍यांपैकी मी नाही. ज्यांना गोडवे गायचे त्यांनी गावे. माझं वैयक्तिक म्हणणं राज्यापालांना सांगणं हे माझं कर्तव्य समजलो म्हणून मी गेलो. मी माझ्या मागणीवर आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहिन, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Deshdoot
www.deshdoot.com