भाजपचं शुक्रवारी ‘माझं अंगण रणांगण आणि महाराष्ट्र बचाव’ आंदोलन
Featured

भाजपचं शुक्रवारी ‘माझं अंगण रणांगण आणि महाराष्ट्र बचाव’ आंदोलन

Dhananjay Shinde

सार्वमत

मुंबई – करोनाला रोखण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने राज्य सरकारविरोधात येत्या शुक्रवारी (22 मे) आंदोलनाची हाक दिली आहे. या दिवशी सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवून घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन निषेध नोंदण्याचं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. माझं अंगण रणांगण आणि महाराष्ट्र बचाव आंदोलन असं या आंदोलनाला नाव देण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून आंदोलनाची माहिती देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, स्थलांतरित मजुरांना गावी जाण्यासाठी ट्रेनचा प्रवास मोफत केला पाहिजे, असे विरोधक सांगतात. मात्र, स्थलांतरित मजुरांनी आहे त्याच ठिकाणी राहावे, असे केंद्राचे म्हणणे होते. परंतु, महाराष्ट्रातील सरकार स्थलांतरित मजुरांना मदत करण्यात अपयशी ठरले. त्यांच्यासाठी राज्य सरकारने निवारा केंद्रे उभारली नाहीत.

केंद्राने मदत व पुनर्वसनासाठी राज्याला 1600 कोटी रुपये दिले होते. या पैशांचा वापर मजुरांसाठी केला जाणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने तसे केले नाही. त्यामुळे मजूर गावाकडे परतत आहेत. याशिवाय, केंद्र सरकार स्थलांतरित मजुरांच्या ट्रेनच्या तिकिटाचा एक तृतीयांश खर्च करत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार मजुरांना एसटीने सोडत असले तरी त्यासाठी दुप्पट पैसे आकारत आहे. मुळात स्थलांतरित मजूर राज्य सोडून जाणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने काय केले, हे सांगावे, करोना राज्यात येऊन 60 दिवस उलटले. तरीदेखील राज्य सरकारने काहीच केलेले नाही. त्यामुळे आम्ही 22 तारखेला महाराष्ट्र बचाव आंदोलन करुन सरकारला जाब विचारणार आहोत.

Deshdoot
www.deshdoot.com