मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी फडणवीस,पाटील यांनी पुढाकार घ्यावा – काकडे

मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी फडणवीस,पाटील यांनी पुढाकार घ्यावा – काकडे

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती केली नाही तर, महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही, असे मत भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले. यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद राहणार की, जाणार याची महाराष्ट्रात सध्या सर्वदूर खूप चर्चा आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यपालांशी चर्चा करून उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य बनण्याचा पेच सोडवावा. असं झालं तर, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात ही गोष्ट सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल आणि जर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी विधानपरिषदेवर नियुक्त न केल्यास महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी क्षत्रियासारखी विरोधकाची भूमिका बजवावी, असेही माजी खासदार काकडे म्हणाले. तर राज्यपालांनी राजकीय कटुता सूडबुद्धीने न ठेवता दोन दिवसात प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

जगाच्या तुलनेत आपल्याकडे कोरोनाचा फैलाव कमी झाला आहे. याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावे लागेल. देशात पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला. महाराष्ट्राबरोबरच देशात कोरोनामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. जीवितहानीसह आर्थिक नुकसान होत असताना विरोधी पक्षांनी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहकार्य केले पाहिजे. ही आपली खरी संस्कृती असल्याचे माजी खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com