राहुरीच्या एका शाळेत शिक्षक-शिक्षिकेचे प्रेमचाळे
Featured

राहुरीच्या एका शाळेत शिक्षक-शिक्षिकेचे प्रेमचाळे

Dhananjay Shinde

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील एका शिक्षण मंडळाशी संबंधित असलेल्या एका शाळेत काल व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशीच शिक्षक-शिक्षिकेच्या घडलेल्या ‘नाजूक’ प्रकरणामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला टाळे ठोकून संताप व्यक्त केला. दरम्यान, वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन मुख्याधिकार्‍यांसह संबंधित शिक्षक आणि शिक्षीकेची बदली केली आहे.या शिक्षक प्रेमीयुगुलावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

ही घटना व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशीच झाल्याने याबाबत चर्चेला उधाण आले आहे. घटनेची माहिती समजताच नगरपालिकेच्या तीन नगरसेवकांनी शिष्टाई करून पोलीस अधिकार्‍यांच्या मध्यस्थीने शाळेचे टाळे उघडण्यास सांगितले. या शिक्षण मंडळाच्या शाळेत गेल्या महिन्याभरापासून शिक्षक व शिक्षिकेमध्ये नको ते प्रकार घडत असताना शाळेतील विद्यार्थ्यांनी दैनंदिन शाळेच्या दुपारच्या सुट्टीत होत असलेला हा ‘आँखो देखा हाल’ काही पालकांना सांगितला. त्यावर या घटनेबाबत काल शुक्रवार दि.14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजे दरम्यान संतप्त पालकांनी शाळेत येऊन टाळे ठोकले. या प्रकरणामुळे परिसरात सर्व नागरिक व महिलांनी गर्दी केली. शाळेला टाळे ठोकल्याने सर्वच विद्यार्थी शाळेच्या बाहेरच ताटकळत उभे होते.

ही घटना समजताच राहुरी नगरपालिकेचे नगरसेवक दिलीप चौधरी, सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, टाकळीमिया येथील सुरेश निमसे आदींनी धाव घेत प्रकरणाचे गांभीर्य समजावून घेत गटशिक्षण अधिकारी सुलोचना पटारे, पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांना पाचारण केले. उपस्थितांनी शाळेला टाळे ठोकणार्‍या पालकांची समजूत काढून शिक्षण अधिकारी पटारे यांनी या शिक्षक व शिक्षिकेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने या प्रकरणावर तात्पुरता पडदा टाकण्यात आला आहे. दरम्यान या संबंधित शिक्षक आणि शिक्षिकेची बदली करण्यात आली आहे. तसेच मुख्याध्यापकांवरही दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेऊन त्यांचीही बदली करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com