पत्नीचा गळा दाबून खून ; वाटापूरच्या तरुणास जन्मठेप

पत्नीचा गळा दाबून खून ; वाटापूरच्या तरुणास जन्मठेप

नेवासा (शहर प्रतिनिधी, तालुका वार्ताहर) – पत्नीचा गळा आवळून खून केल्याच्या खटल्यातील नेवासा तालुक्यातील वाटापूर येथील दोषी पतीस जन्मठेप व दंड तसेच पतीसह छळाच्या गुन्ह्यात सासू ससासर्‍यांना दोन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी सुनावली.

याबाबत माहिती अशी की, आरोपी पती किशोर मुरलीधर बाचकर, सासरा मुरलीधर सबाजी बाचकर व सासू तान्हाबाई मुरलीधर बाचकर सर्व रा. वाटापूर ता. नेवासा यांनी मयत जयश्री किशोर बाचकर हिचा वेळोवेळी पैशासाठी व मुलबाळ होत नाही म्हणून छळ केला होता.

25 ऑगस्ट 2017 रोजी आरोपी पती किशोर मुरलीधर बाचकर याने पत्नी जयश्री हिचा गळा दाबून खून केला. त्यावरुन मयत जयश्री हिचे वडील दादाभाऊ लिंबाजी थोरात रा. ढवळपूरी ता. पारनेर यांनी मयत जयशी हिच्या झालेल्या छळाबाबत व खुनाबाबत वर नमूद आरोपींसह एकूण चार व्यक्तींविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सदर फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 302, 304 (ब), 498 (अ), 323, 504, 34 सह हुंडाबंदी अधिनियम 1961 चे कलम 3 व 4 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आलीण सदर गुन्ह्याचा तपास होवून सोनई पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटल्यात चौकशीकामी सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात फिर्यादी, डॉ. पवार व अन्य सक्षीदार यांचे जबाब व परिस्थितीजन्य पुरावा महत्वाचा ठरला. सरकार पक्षातर्फे सादर साक्षीपुरावे व युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींना दोषी धरुन शिक्षा सुनावली.
आरोपी पती यास भारतीय दंड विधान कलम 302 अन्वये जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पती व सासू सासरे यांना विवाहितेच्या छळासाठी दोषी धरुन भारतीय दंड विधान कलम 498(अ) अन्वये प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी रक्कम 5 हजार रुपये इतकी दंडाची शिक्षा सुनावली. खटल्यातील एका आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सदरच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले. त्यांना अतिरिक्त सरकारी वकील मयुरेश नवले, पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष हजारे, कॉन्स्टेबल अनिल जाधव, कॉन्स्टेबल मुस्तफा शेख, सुहास बटुळे, श्री. शिंदे, गर्जे, गणेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

अशी झाली शिक्षा  – दोषी ठरलेला आरोपी पती किशोर मुरलीधर बाचकर यास खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व दहा हजार रुपये दंड. सासू-सासरे मुरलीधर सबाजी बाचकर व तान्हाबाई मुरलीधर बाचकर तसेच पती किशोर या तिघांना छळ केल्याच्या गुन्ह्यात दोन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com