राजुरीत बिबट्याबरोबर दोन हात करत युवकाने केली सुटका

राजुरीत बिबट्याबरोबर दोन हात करत युवकाने केली सुटका

तरुण शेतकर्‍याच्या मानेला व पायाला घेतला चावा

राजुरी (वार्ताहर) – राहाता तालुक्यातील राजुरी जवळील गोरे वस्तीजवळच असलेल्या आपल्या शेतात पहाटेच्या मक्याला पाणी भरत असताना अचानक एका बिबट्याने तरुण शेतकर्‍यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात या तरुण शेतकर्‍याने बिबट्याबरोबर दोन हात करत त्याच्या तावडीतून सुटका करुन घेत धावत जावून शेजारी असलेल्या वस्तीकडे पळत जात आरडाओरडा केली. या आरडाओरडीचा आवाज ऐकून बिबट्याने त्या ठिकाणाहून धूम ठोकली.
पायाला व मानेला बिबट्याने धरल्याने तरुण शेतकरी जखमी झाला आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली असून यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

राहता तालुक्यातील राजुरी गावाच्या शिवेला पाण्याच्या तळ्याजवळ गोरे वस्तीजवळच लोकवस्ती असून येथे काल शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बाभळेश्वर येथील तरुण महेश सुधाकर बेंद्रे याची गट नंबर 211 मध्ये शेती असून यामध्ये गहू व मकाचे पीक असल्यामुळे तो सकाळी पहाटे पाचच्या दरम्यान आपल्या शेतात असणार्‍या मकाला पाणी भरण्यासाठी गेला होता. पाणी भरण्याचे चालू असताना मोटारीचे पाणी कमी पडले म्हणून म्हणून तो आपल्या गव्हाच्या शेतामधून मोटारीकडे जात असताना मागून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविला. प्रथम या बिबट्याने त्याच्या पायाला पकडले. त्याच्या तावडीतून महेशने आपला पाय कसाबसा सोडविला. त्यानंतर बिबट्याने परत त्याच्या मानेजवळ पकडण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याशी दोन हात करून महेशने सोडविण्याचा कसाबसा प्रयत्न केला. तरीही बिबट्याने त्या तिसर्‍यांदा त्याच्यावर हल्ला चढविला या हल्ल्यातून त्याने आपली कशीबशी सुटका करून घेतली.

घाबरलेल्या अवस्थेत पळत जाऊन महेशने आरडाओरडा केला. मात्र आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने तेथूनच धूम ठोकली. परंतु लोकवस्ती लांब असल्यामुळे कुणालाही त्याचा आवाज न आल्यामुळे तो तसाच पुढे जाऊन शेतकरी गोकुळ गोरे व अन्य शेतकर्‍यांना त्याने माझ्यावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे सांगितले. यानंतर वस्तीतील शेतकरी व महिलांनी त्या युवकाकडे त्याची विचारपूस करून धीर दिला. त्यानंतर त्याला उपचारासाठी लोणी येथे सरकारी हॉस्पिटलला पाठवण्यात आले. यानंतर लोणी येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नगर येथील सिव्हील हॉस्पिटलला पाठविण्यात आले.

महेश बेंद्रे यांच्या मानेला व हाताला बिबट्याने धरल्याच्या खुणा दिसत असून दैवत बलवत्तर म्हणून तो त्यां नरभक्षक़ बिबट्याच्या तावडीतून सुटला. राजुरी व प्रवरा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांनी मोठा धुमाकूळ घातल आहे. गळनिंब, ममदापूर, चांडेवाडी, तिसगाव वाडी, बाभळेश्वर, पिंपरी निर्मळ, वाकडी परिसर, लोहगाव, तिसगाव व परिसरात बिबटे फिरताना दिसत असतात. गेल्या आठ ते दहा दिवसापासून बिबटे मनुष्यावर हल्ला करायला लागले असल्यामुळे नागरिक शेतकरी शेतमजूर व शाळेत जाणारे मुले मुली यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. वन अधिकार्‍यांनी लक्ष घालून या बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com