महाराष्ट्र बँकेचे एटीएमसह 20 लाखाची रोकड पळविली
Featured

महाराष्ट्र बँकेचे एटीएमसह 20 लाखाची रोकड पळविली

Sarvmat Digital

बाभळेश्वर (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशिन तोडफोड करीत पळविले. यात 19 लाख 93 हजार 200 रुपये इतकी रक्कम चोरीला गेली आहे.

बाभळेश्वर येथे घोगरे पेट्रोल पंपाच्या समोर बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. तेथेच त्यांचे एटीएम आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएमचा दरवाजाच्या काचा तोडून आत प्रवेश केला. संपूर्ण एटीएम मशिन बाहेर काढले. मात्र ते जड असल्यामुळे ते गाडीने ओढून रस्त्याच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.

मात्र या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले. याची चाहूल चोरट्यांना लागताच त्यांनी एटीएम मशिन गाडीत टाकून लोणीच्या दिशेने धूम ठोकली. एटीएम मशिनचे बरेचसे पार्ट रस्त्यावरच पडले होते. बाभळेश्वर येथील काही तरुणांनी या गाडीचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. परंतु ती गाडी भरधाव वेगाने निघून गेली. महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याची ही दुसरी घटना आहे.

भरवस्तीत असलेले एटीएम फोडल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडालेली आहे. चोरट्यांनी चोरी करताना एटीएममध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकल्यामुळे सीसीटीव्ही फुटेज दिसत नाही. हे एटीएम खासगी कंपनीमार्फत चालविले जाते. एटीएममध्ये मोठ्या स्वरुपात रक्कम असताना देखील येथे सुरक्षा रक्षक नाही. एटीएमची संपूर्ण सुरक्षा ही रामभरोसे आहे.

श्वानपथकाने वडारवाडीच्या आसपास मार्ग दाखविला. बाभळेश्वर पोलीस स्टेशन एटीएमपासून हाकेच्या अंतरावर आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटे एटीएम घेऊन पळून गेले. नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला तोपर्यंत पोलिसांना या घटनेची खबरही नव्हती. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 457, 380, 427 अन्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील पुढील तपास करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com