राज्यात कोण निर्णय घेतो, त्यांनाच कळेना

jalgaon-digital
4 Min Read

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे : आघाडी सरकारने करोनापुढे हात टेकले

अहमदनगर (प्रतिनिधी) – काँग्रेसला महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले नसल्याचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी सांगतात. याचाच अर्थ सरकारमध्ये समन्वय नाही. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये कोण निर्णय घेतो, हे त्यांनाच कळत नाही. महाविकास आघाडी सरकारने करोनापुढे हात टेकले असल्याची टीका केंद्रीय अन्न राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडी सरकारवर केली. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत, अन्यथा त्या विद्यार्थ्यांवर कोव्हिडचा शिक्का बसेल, असेही ते म्हणाले.

नगर येथील विखे फाउंडेशन येथे एका खासगी बैठकीसाठी मंत्री दानवे आले होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, श्याम पिंपळे उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, देशांतील सर्व परिस्थिती सुरळीतपणे सुरू होण्यास अवधी लागेल. ज्यावेळी नियमित दळणवळण, कंपन्या, उद्योग सुरू होतील त्यानंतरचं बेरोजगारांना संधी उपलब्ध होईल. केंद्र सरकारने सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांना शेतकर्‍यांना देण्यासाठी पैसा दिला होता. तो सुद्धा संबंधित बँकांनी दिलेला नाही. त्यासाठी आता खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे दानवे म्हणाले.

लॉकडाऊननंतर कुणावर उपासमारीची वेळ येणार नाही याची दक्षता घ्या, तसेच एखाद्याला घरभाडे मागू नका, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. देशांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून दळणवळण, उद्योग व्यवसाय बंद होते. ते सुरळीत व्हायला कालावधी लागेल. देशामध्ये पंतप्रधान मोदी यांनी वेळीच लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखता आला. आपली लोकसंख्या चीनच्या बरोबरीची आहे. एवढे असताना देखील आपण प्रादुर्भाव रोखला. करोनाच्या काळात अन्न पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मोदी यांनी एक लाख 70 हजार कोटींचे पॅकेज दिले. जनधन योजनेच्या खात्यात प्रत्येकाला पाचशे रुपये जमा केले. साडेआठ कोटी जनतेला उज्वला गॅस कनेक्शन दिले. मोदी यांनी दिलेल्या पॅकेजमुळे शेती उद्योगाला फायदा होत आहे.

2011 च्या जनगणनेनुसार देशांमध्ये 125 कोटी पैकी 80 कोटी लोकांना दोन रुपये प्रमाणे गहू व तीन रुपये प्रमाणे तांदूळ देण्यात आला. एवढेच नाही तर ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, जो अत्यंत गरीब आहे अशांना पाच किलो धान्य सरकारने दिले. स्थलांतरित मजुरांचा प्रश्नही सोडवला. शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रतिमहा सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, त्याचीही अंमलबजावणी सरकारने केल्याचे दानवे यांनी सांगितले. देशामध्ये अन्नसाठा हा मुबलक आहे. किमान दोन वर्षे पुरेल एवढा साठा असून भविष्यामध्ये धान्य टंचाई होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा मिटायला तयार नाही. कर्जमाफीच्या आश्वासन राज्य सरकारने दिले पण अनेक शेतकर्‍यांना ती मिळू शकली नाही. पावसाळा तोंडावर आला असताना खरिपासाठी शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारखान्यांचे प्रश्न आहेत, रोजगारांचे प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांच्या संदर्भात आम्ही आता एकत्रितपणे पक्ष पातळीवर बैठका घेऊन विचारविनिमय करून पक्षश्रेष्ठींचा विषय मांडणार आहोत. देशामध्ये करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती आहे. पूर्वी राज्यांमध्ये रुग्ण सापडल्यावर त्याच्या नातेवाईकांना तसेच इतर संपर्कात आलेल्यांना रुग्णालयात ठेवले जात होते. मात्र आता फक्त पेशंटला रुग्णालयात ठेवले जात आहे. राज्य सरकारने आता करोनापुढे हात टेकले आहेत, असा आरोपही दानवे यांनी केला.

अंतिम परीक्षांबद्दल विचारले असता ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा घेतल्या पाहिजे. परीक्षा घेतल्या नाहीतर त्यांच्यावर करोना काळातील विद्यार्थी असल्याचा शिक्का बसेल. असे होता कामा नये म्हणून त्यांच्या अंतिम परीक्षा घेणे आवश्यक आहे.

विखे पाटील फाऊंडेशन येथे केंद्रीय अन्न राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील भाजप नेत्यांशी निगडित असलेल्या मोजक्या साखर कारखानादारांच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेतली. बैठकीला आ. राधाकृष्ण विखे, दौंडचे आ. राहुल कुल, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील, माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्यासह साखर कारखान्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कर्जमाफी, पीएम किसान योजना, साखर उद्योगतील समस्यांसह इतर प्रश्नांवर चर्चा झाल्याचे समजते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *