Saturday, April 27, 2024
Homeनगरजिल्ह्यात पहिला बळी, श्रीरामपूरच्या तरूणाचा पुण्यात मृत्यू

जिल्ह्यात पहिला बळी, श्रीरामपूरच्या तरूणाचा पुण्यात मृत्यू

गोवर्धनपूरच्या सहा अहवालांची प्रतिक्षा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –  श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील कोरोना बाधित तरुणाचा काल पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा नगर जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी आहे. या वृत्तास ससून रुग्णालयाचे डीन यांनी मोबाईलवरून दुजोरा दिल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंतराव जमदाडे यांनी दिली.

- Advertisement -

तालुक्यातील गोवर्धन येथील तरुणास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला अगोदर श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव नंतर लोणी व पुढील उपचारासाठी नगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नगरमध्ये दि. 4 एप्रिल रोजी घेतलेल्या चाचणीत त्या तरुणाचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. नंतर त्याला पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दि. 5 एप्रिल रोजी ससून रुग्णालयात घेतलेला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोन डॉक्टरसह 28 जणांचा नगरच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये तपासणी केली त्यापैकी 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर सहा अहवालांची प्रतिक्षा आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्या 21 जणांना वडाळा येथील तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान काल शुक्रवारी सकाळी 10.45 वाजता त्याचा मृत्यू झाला. नगर जिल्ह्यातील व श्रीरामपूर तालुक्यातील कोरोनाचा हा पहिला बळी आहे. त्यामुळे तालुक्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, काळजी घ्यावी, अनावश्यक ठिकाणी गर्दी करू नये, महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे असे, आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वसंतराव जमदडे यांनी केले आहे.
या रूणाचा मृत्यू न्यूमोनिया टू कोरोना, हायपर टेन्शन, अवयव बंद पडल्याने झाला असल्याचे रूग्णालयाने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या