यंदा झेडपीच्या शाळेत ऑनलाईन पट नोंदणी

यंदा झेडपीच्या शाळेत ऑनलाईन पट नोंदणी

करोना इफेक्ट : दोन दिवसांत माहिती संकलन होणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांमार्फत पहिलीच्या वर्गासाठी मे महिन्यांत त्यात्या गावात फिरून विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात येते. यंदा मात्र, करोना संसर्गामुळे शिक्षकांना गावात फिरून ऑफलाईन विद्यार्थ्यांची पटनोंदणी करता आली नाही. मात्र, बहुतांशी ठिकाणी शिक्षकांच्या पुढाकारातून आणि प्राथमिक शिक्षण विभागाच्या सुचनेवरून ऑनलाईन पटनोंदणी करण्यात आली आहे. या पटनोंदणीचा अहवाल दोन दिवसांत संकलित होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी दिली.

जिल्ह्यात दरवर्षी मे महिन्यांत आणि त्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच्या वर्गाची पट नोंदणी करण्यात येते. या पट नोंदणीवर शिक्षकांचे भवितव्य अवलंबून असल्याने शिक्षक देखील उन्हाळ्याच्या सुट्टीत आवडीने पहिल्याच्या वर्गात दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांची नोंदणी करत असतात. यंदा 15 ऑक्टोबर 2020 ला सहा वर्षेपूर्ण करणारे विद्यार्थी पहिली प्रवेशासाठी पात्र आहेत. यंदा करोना लॉकडाऊनच्या काळात मोठ्या संख्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ऑनलाईन पट नोंदणी केली आहे.

या पट नोंदणीचे संकलन करण्याची कार्यवाही जिल्हा परिषद स्तरावर सुरू आहे. दोन दिवसांत ही माहिती पूर्ण होणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. त्यानुसार कोणत्या तालुक्यात किती विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्याच्या वर्गात प्रवेशासाठी नोंदणी केली हे समोर येणार आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक मोठ्या संख्याने तंत्रस्नेही झालेले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशाची संख्या वाढत आहे. मात्र, ग्रामीण भागात आजही जिल्हा परिषदेची शाळा आणि खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्याथ्यार्र्ंची पळवापळवी सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा ऑनलाईन शिक्षण पध्दतीकडे ओढा वाढला आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील मुलांना होत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमामुळे प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालक आणि विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे.
– सुनील पवळे, मुख्याध्यापक, सांगवी प्राथमिक शाळा, नेवासा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com