झेडपी समित्यांची फोडाफोडी
Featured

झेडपी समित्यांची फोडाफोडी

Sarvmat Digital

बांधकाम-कृषी दाते यांच्याकडे तर पशुसंवर्धन-अर्थ गडाखांच्या वाट्याला

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत विषय समित्यांचा पदभार सोपविताना विद्यमान अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी यापूर्वीच्या पारंपारिक विषय समित्यांची फोडाफोडी केली. यामुळे सोमवारी पार पडलेल्या विशेष सभेनंतर सुमारे तासाभराने बांधकाम आणि कृषी समितीचे सभापतिपद हे पारनेरचे काशिनाथ दाते यांच्याकडे तर पशु आणि अर्थ समितीच्या सभापतिपदी सुनील गडाख यांना संधी देण्यात आल्याची घोषणा केली. फोडाफोडी करून सोपविण्यात आलेला पदभार हा वर्षभरासाठी असून वर्षभरानंतर पुन्हा गडाख आणि दाते यांचे खाते बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेत सभापतीपदाचा पदभार सोपविण्यासाठी सोमवारी विशेष सभा बोलविण्यात आली होती. या सभेत सर्व सदस्यांनी एकमताने सर्व अधिकारी अध्यक्षा घुले यांना सोपविले. मात्र, त्यानंतर देखील सभा संपेपर्यंत अध्यक्षांनी कोणत्या सभापतीकडे कोणत्या समितीचा पदभार याबाबत घोषणा केली नाही. ही विशेष सभा संपल्यानंतर सुमारे तासाभराने स्थायी समिती सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्षा घुले यांनी दाते आणि गडाख यांच्याकडे सोेपविण्यात आलेल्या समित्याची घोषणा केली. यावेळी उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती उमेश परहर, सभापती मिराबाई शेटे, सभापती सुनील गडाख, सभापती काशिनाथ दाते, सदस्य अनिल कराळे, अजय फटांगरे, जालींदर वाकचौरे आदी उपस्थित होते.

यावेळी सभापती गडाख यांनी शिवसेनेच्या वरिष्ट नेत्यांच्या आदेशानुसार विषय समित्यामध्ये अदलाबदल करण्यात आली आली आहे. शिवसेनेचे कोअर कमिटीचे अध्यक्ष मंत्री सुभाष देसाई, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे नेते प्रशांत गडाख, माजी आ. विजय औटी, जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे यांच्या आदेशानूसार हा बदल करण्यात आला आहे. यामुळे दाते आणि मला न्याय मिळणार असून वर्षभरानंतर पुन्हा खांदे पालट होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेनंतर काँग्रेसचे प्रतोद अजय फटांगरे यांनी गडाख आणि दाते यांना शुभेच्छा दिल्या. तर भाजपचे प्रतोद यांनी आदलाबदल करून जिल्हा परिषदेत खाते वाटप झाले असले तरी समन्वयातून जिल्ह्याचा विकास व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेवनेचे संदेश कार्ले यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या.

स्थायीत विखे- फटांगरे सामना
जिल्हा परिषदेच्या सभापती यांना खाते वाटप करण्यात आले असले तरी स्थायी, जलव्यवस्थान, कृषी समितीच्या रिक्त होणार्‍या सदस्यांच्या जागेवर माजी पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी सदस्यांनी अध्यक्षा यांच्या अर्ज दिलेले आहेत. यात स्थायीसाठी माजी अध्यक्षा शालीनीताई विखे आणि माजी सभापती अजय फटांगरे यांच्यासह अन्य एक अर्ज आलेला आहे. आता अध्यक्ष घुले यांना या तिघांमधून एकाची स्थायी समितीचा सदस्य म्हणून निवड करावी लागणार आहे.

अनेक वर्षांनी फुटल्या समित्या
जिल्हा परिषदेत कोणत्या सभापतीकडे कोणती समितीचे कार्यभार सोपवयाचा हे अध्यक्षांना अधिकार आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात अशा प्रकारे विषय समित्यांची बदला-बदल झालेली नाही. मात्र, जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीने हे केले आहे. कृषी आणि पशूसंवर्धन एकमेकांशी संबंधीत विभाग असतांना त्याची फाटाफुट करण्यात आली आहे.

दोन दिवसांत सदस्यांची निवड
जिल्हा परिषदेतील स्थायी, जलव्यवस्था, कृषी आणि पशूसवंर्धन समितीमधील सदस्यांसह 14 तालुक्याच्या सभापतीची निवड संबंधीत रिक्त होणार्‍या विषय समितीच्या सदस्यपदी करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया पारपडणार असल्याचे उपाध्यक्ष प्रताप शेळक यांनी सांगितले.

दाते यांनी स्वीकारला पदभार
सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास कृषी आणि बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी पदभार स्वीकारला. यावेळी माजी आ. विजय औटी तर सुनील गडाख आज पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com