‘अर्थ-बांधकाम’साठी शिवसेनेची मुंबईत पेरणी
Featured

‘अर्थ-बांधकाम’साठी शिवसेनेची मुंबईत पेरणी

Sarvmat Digital

राष्ट्रवादीचे पत्ते दादांच्या हाती : ‘क्रांतिकारी’चे वेट अ‍ॅण्ड वॉच, काँग्रेसचा निर्णय आज

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांचा सभापतींच्या निवडी उद्या मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी रविवारी मुंबई गाठत पक्षश्रेष्ठी आणि जिल्हा संपर्कप्रमुख यांची भेट घेत जिल्हा परिषदेतील अर्थ आणि बांधकाम समितीच्या सभापती पदांबाबत चर्चा केली.

या चर्चेनंतर शिवसेनेच्या वाट्याला येणार्‍या सभापती पदांसोबतच त्याठिकाणी कोणाला संधी मिळणार याचा निरोप ऐनवेळी देण्यात येणार असल्याचे सेना नेत्यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, आज रात्री राष्ट्रवादीचे जिल्हा निरीक्षक अंकुश काकडे नगरमध्ये येणार असून त्यानंतर सेना, काँग्रेस आणि शेतकरी क्रांतिकारी पक्षाच्या नेत्यांची बैठक होऊन जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापती पदाचा निर्णय होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांपैकी काँग्रेस पक्षाकडे समाज कल्याण समितीच्या सभापती पदाचा उमेदवार नसल्याने या समितीसाठी राष्ट्रवादी, सेना आणि ्रांतिकारी पक्षाच्या सदस्यांना चर्चा करावी लागणार आहे. विद्यमान परिस्थितीत ही समिती राष्ट्रवादीकडे आहे.

दुसरीकडे बांधकाम समितीसाठी शिवसेना आणि क्रांतीकारी पक्षात स्पर्धा होती. मात्र, आता शिवसेनेच्या सदस्यांकडून या समितीसाठी जोर लावण्यात येत आहे. यासाठी काल रविवारी जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह गट नेते अनिल कराळे, सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, गोविंद मोकाटे पाथर्डीचे पक्षाचे पदाधिकारी रफीक शेख हे मुंबईला गेले होते.

त्यांनी जिल्ह्यातील पक्षाची स्थितीची माहिती दिली असून भविष्यात पक्षाला बळ देण्यासाठी जिल्हा परिषदेत महत्वाचे सभापती मिळावे, यासाठी साखर पेरणी केली आहे. पक्षाचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी सर्व परिस्थिती ऐकून घेतली असून पक्ष प्रमुखांसोबत चर्चा करून योग्य निर्णय कळविणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तर क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडून सध्या वेट अ‍ॅण्ड वॉच सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारे सभापती आणि त्या ठिकाणी कोणाला संधी मिळणार याबाबत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत. पक्षाचे जिल्ह्यातील नेते आणि पक्ष निरिक्षक यांच्यात चर्चा होवून अंतिम निर्णयासाठी अजितदादाकडे विचारणा करणार आहेत. काँग्रेसच्या सभापतीबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात निर्णय घेणार असून पक्षातील उत्तर दक्षिण समतोल साधून कोणाला सभापती पदी संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर भाजप विरोधकांच्या भूमिकेत राहणार आहे. येणार्‍या काळात भाजप जिल्हा परिषदेत कशी वाटचाल करणार, विषय समित्या निवडीत कोण कोण नाराज होणार यावर भाजपचे लक्ष राहणार असून त्यानंतर भाजपची पुढील दोन वर्षातील वाटचाल राहणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com