Thursday, April 25, 2024
Homeनगरतपासणीपूर्वीच वृक्ष लागवड करपली !

तपासणीपूर्वीच वृक्ष लागवड करपली !

जिल्हा परिषद : 50 कोटी वृक्ष लागवडीतील 50 टक्के रोपे जिवंत

अहमदनगर (प्रतिनिधी)– मागील भाजप सरकारच्या काळात लावलेल्या 50 कोटी झाडांची चौकशी होणे बाकी असताना जिल्हा परिषदेने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लागवड केलेली 63 लाख झाडांपैकी 31 लाख झाडेच जिवंत असल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत झालेल्या या लागवडीत 50 टक्के झाडे जगलेली आहेत.

- Advertisement -

राज्यातील गत भाजप सरकारने लागवड केलेल्या 50 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी आता राज्य पातळीवरून होणार आहे. या योजनेसाठी राज्यात सुमारे तीन हजार कोटी रूपये खर्च केले गेले होते. ते तीन हजार कुठे गेले हे चौकशीतून समोर येणार आहे. लोकप्रतिनिधींनी या वृक्ष लागवडीबद्दल संशय व्यक्त केल्याने राज्य सरकारने याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेतर्फे वृक्ष लागवड करण्यात आली. या मोहिमेत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत, बांधकाम, शिक्षण, पशुसंवर्धन व आरोग्य विभागाने सहभाग घेतला.

2017 सालच्या पावसाळ्यात 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम होता. त्यात 5 लाख 84 हजार 803 रोपांची लागवड करण्यात आली. 2018 च्या पावसाळ्यात 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम होता. त्यात 14 लाख 73 हजार 368 रोपे लावण्यात आली. तर 2019 च्या पावसाळ्यात 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम होता.

त्यात 42 लाख 75 हजार 771 रोपांची लागवड करण्यात आल्याची सरकारी आकडेवारी आहे. ग्रामपंचायत विभागाने सर्वाधिक 61 लाख वृक्षलागवड केली आहे. तर बांधकाम विभागाने सर्वात कमी 2 हजार वृक्ष लागवड केली आहे. एकूणच सरासरी पाहता 50 ते 65 टक्के वृक्ष जिवंत असल्याचे लक्षात येते.

2017 सालीत लागवड करण्यात आलेल्या रोपांपैकी 2019 अखेर 45 टक्के, 2018 मध्ये लागवड करण्यात आलेल्या रोपांपैकी 40 टक्के 2019 मध्ये लागवड करण्यात आलेल्या रोपांपैकी 68 टक्के रोपे जिवंत आहेत. जिल्ह्यात तीन वर्षांत 63 लाख 33 हजार 942 रोपांची लागवड झालेली असून त्यापैकी किती रोपे विद्यमान स्थितीत जीवंत आहेत. याची सुधारित आकडेवारी तपासणीनंतर समोर येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या