Friday, April 26, 2024
Homeनगरयशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे ‘कृतज्ञता पुरस्कार’ जाहीर

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे ‘कृतज्ञता पुरस्कार’ जाहीर

न्या. नरेंद्र चपळगावकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. पी. डी. पाटील यावर्षीचे मानकरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – यशवंत सामाजिक प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे ‘कृतज्ञता पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, शिक्षण तज्ज्ञ डॉ. पी. डी. पाटील यांना जाहीर झाले असल्याची माहिती यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी दिली.

- Advertisement -

सोनई (ता. नेवासा) येथील मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात रविवारी (ता. 23) सायंकाळी 4 वाजता या पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दरम्यान या पुरस्कार वितरण सोहळ्यात आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार व बिजमाता राहीबाई पोपेरे यांचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात येणार आहे.

वाङ्मय, समाजजीवन, राजकारण आणि न्यायकारणाचे अभ्यासक निवृत्त न्यायाधीश नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश असून वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील व सत्वशील मराठी लेखक आहेत. 2005 मध्ये माजलगाव येथे झालेल्या 26 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे तसेच 2014 मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या 9 व्या जलसाहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांची सुमारे तीस पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनसह अनेक संस्थानचे वाङ्मयीन पुरस्कार मिळाले आहेत.

कॅथॉलिक पंथाचे धर्मगुरू व मराठी लेखक असलेले ज्येष्ठ साहित्यिक असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे ख्रिस्ती व ज्यू धर्म हे प्रमुख अभ्यास विषय आहे. जानेवारी 2020 मध्ये उस्मानाबाद येथे पार पाडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या ‘सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा 2013 मध्ये राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार, तर 2017 मध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान हे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांची आत्तापर्यंत 11 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

डॉ. पी. डी. पाटील हे पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष आहेत. ते पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे जानेवारी 2016 मध्ये झालेल्या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. एक उत्कृष्ट शिक्षण संस्था प्रमुख म्हणून स्वत:ची घडण करणारे डॉ. पाटील यांचे ज्ञानक्षेत्रातलं योगदान मोठे राहिलेले आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणार्‍या अशा मान्यवरांच्या आयुष्याचा प्रवास हा जिद्दीचा व सातत्याचा असतो. म्हणूनच तरुणांनी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमाचा लाभ व प्रेरणा घ्यावी, असे आवाहन यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी केले आहे.

यापूर्वीचे ‘कृतज्ञता पुरस्कार’ सन्माननीय
यापूर्वी ज्येष्ठ सामाजसेवक आण्णा हजारे, ज्येष्ठ कवी व गीतकार गुलजार, शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सामाजिक कार्यकर्त्या नसिमा हुरजूक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शास्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, अभिनेता सयाजी शिंदे, दिग्दर्शक व निर्माते नागराज मंजुळे, डॉ. स्मिता व डॉ. रवींद्र कोल्हे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर, कवी रामदास फुटाणे यांना ‘कृतज्ञता पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या