प्रभाग सहामधील मतदानाच्या टक्केवारीकडे लक्ष
Featured

प्रभाग सहामधील मतदानाच्या टक्केवारीकडे लक्ष

Sarvmat Digital

प्रचार संपुष्टात : महाविकास आघाडी स्थापनेनंतर पहिलीच निवडणूक

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका प्रभाग सहा (अ) मधील पोटनिवडणुकीचा प्रचार काल मंगळवारी संपला. अखेरच्या टप्प्यात प्रचार फेर्‍या आणि भेटीगाठीमुळे प्रभागातील मतदारांना निवडणुकीचा फिल निर्माण झाला. एरवी वारेमाप खर्च होणार्‍या निवडणुकींचा विचार करता यावेळी नेमकी उलट परिस्थिती होती. त्यामुळे मतदान किती होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शिवसेनेच्या सारिका भुतकर यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र फेटाळण्यात आल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. तसेच राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी झाल्यानंतर होणारी ही पहिली पोटनिवडणूक आहे. येथे भाजपच्या पल्लवी जाधव आणि शिवसेनेच्या अनिता दळवी यांच्यात सरळ लढत होत आहे. या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच जात पडताळणी समितीने मान्य केलेले जात प्रमाणपत्र सादर केल्याने येथे यावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता मिटली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीने अलिप्त भूमिका घेतली होती. शेवटचे दोन दिवस शिवसेना आमचा उमेदवार महाविकास आघाडीचा असल्याचे सांगत असली, तरी राष्ट्रवादी शेवटच्या दोन दिवसात शिवसेनेला हिरवा कंदील दिला आहे. त्यातही त्यांच्या भूमिकेबाबत संशय घेतला जात आहे. कारण महापालिकेत राष्ट्रवादी भाजपबरोबर सत्तेत असल्याने पोटनिवडणुकीत शिवसेनेला ते खरच साथ देतील का अन दिली तरी ती किती असेल, याबाबत प्रभागात साशंकता व्यक्त होत आहे. शिवाय शिवसेनेतही दोन गट पडले असून, एक गट राष्ट्रवादीसोबत आणि दुसरा गट स्वतंत्र अशी स्थिती आहे.

या प्रभागात भाजपचे प्राबल्य आहे. चारपैकी तीन नगरसेवक भाजपचे आहेत. मतदार देखील भाजपला मानणारे असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. तर सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्यामुळे यावेळीही शिवसेनाच बाजी मारेल, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. शिवसेनेने प्रचार फेरी काढून मतदारांना आवाहन केले आहे, तर भाजपकडून ‘घर टू घर’ प्रचार करून मतदारांना चुचकारण्यात येत आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वारेमाप पैशांचा वापर होत असल्याचे चित्र असते. पोटनिवडणुकीत मात्र असा प्रकार दिसलेला नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी किती असेल, याबाबत दोन्ही राजकीय पक्षांमध्ये साशंकता आहे.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर पक्षाच्या आदेशान्वये सोमवारी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांना भेटले. त्यावेळी पोटनिवडणुकीत प्रचारात सक्रीय होण्याचे आवाहन त्यांनी केले. आ. जगताप यांनीही महाविकास आघाडी म्हणून होकार दिला. सोमवारी सायंकाळी प्रभागात काही भेटीगाठीही त्यांनी घेतल्या. त्यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे काही नगरसेवक होते. मात्र याचा परिणाम किती होईल, शेवटच्या रात्री नेमकी काय भूमिका असेल याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

दावे-प्रतिदावे
भुतकरवाडी, रासनेनगर, धर्माधिकारी मळा आदी भागाचा या प्रभागात समावेश आहे. यातील बहुतांश भागाने यापूर्वीही भाजपलाच साथ दिलेली आहे. शिवाय महापौर बाबासाहेब वाकळे या प्रभागातूनच प्रतिनिधीत्त्व करत आहेत. त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रखरपणे दावा केला जात आहे. शिवसेना देखील तेवढ्याच तडफेने निवडणूक जिंकणार असल्याचा दावा करत आहे. 

Deshdoot
www.deshdoot.com