मुलीसह महिलेने शिर्डीच्या भोजनालयासमोर घेतले विष
Featured

मुलीसह महिलेने शिर्डीच्या भोजनालयासमोर घेतले विष

Sarvmat Digital

शिर्डी (प्रतिनिधी)- करोना महामारीमुळे गोरगरिब व सर्वसामान्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे एकवेळचे अन्न मिळविणे दुरापास्त झालेल्या एका गरीब कुटुंबातील महिलेने गृहकलहातून आपल्या तीन मुलांना घेऊन घर सोडले होते. तरीही उपासमारी नशिबीच होती. शिर्डी येथे जाऊन आपल्याला काही मिळेल या आशेवर आलेल्या महिलेस काम तर नाही परंतु जे संस्थानचे भोजनालय होते तेही बंद असल्यामुळे सर्वच दारे बंद झाल्यासारखे वाटले आणि मनात आता जगून काहीच उपयोग नाही म्हणून या महिलेसह तिच्या मुलीने भोजनालयासमोरच विषारी पदार्थ घेऊन जीवन संपविण्याचा प्रकार घडला. मात्र त्या दोघींवर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू असून दोघींची प्रकृती सुधारत आहे.

करोना या संसर्गजन्य आजारामुळे देशात सर्वत्रच लाकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे सर्वच ठप्प झाले. गोरगरिबांच्या हातातले काम गेले. अनेक दिवसांपासून एकवेळचे अन्न मिळणेही महाग झाले. यात कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील मंगल किसन ढोले (वय 45) व मुलगी सुमन विठ्ठल कुदळे (वय 25) व लहान मुलगा गौरव (वय 3) व सौरव (वय 1 वर्ष) या चौघांनी गृहकलहातून घर सोडले. या महिलेसह तिची मुले पायी शिर्डी येथे आले. शिर्डी येथेही कामासाठी प्रयत्न केले. परंतु कामही मिळेना. त्यात शिर्डी येेथे भोजनालयासमोरच महिलेने शेवटी कंटाळून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.

या महिलेने व तिच्या मुलीने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही बाब जवळपास असलेले साईबाबा संस्थानचे सुरक्षा रक्षक व काही तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. शिर्डी पोलिसांनी तात्काळ गंभीर दखल घेऊन साईनाथ रुग्णालयात त्यांना दाखल केले. त्याच्यावर डॉ.प्रफुल्ल पोरवाल यांनी उपचार सुरू केले आहेत.

मंगल ढोले या महिलेच्या शरिरात रक्त कमी असल्याचे तपासणी मध्ये पुढे आले आहे. आता दोघींचीही प्रकृती सुधारत आहे. या महिलेचे पती किसन ढोले यांनी आठ दिवसांपूर्वीच पत्नी व त्यांची मुले घरातून निघून गेली असल्याची तक्रार कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. बरीच शोधाशोध करुनही त्याचे कुटुंब मिळून आले नव्हते. परंतु ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता ही महिला कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील असल्याची समजले. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची माहिती घेऊन ही खबर तिचे पती किसन ढोले यांना कळविली.

कौटुंबीक ताणतणाव, असलेली गरिबी, बेरोजगारी व दोन महिन्यांपासून नसलेला रोजगार यातून गृहकलह झाला आणि त्यातून हा प्रकार घडला असावा असा कयास सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब शिंदे यांनी व्यक्त केला. बेरोजगारी, गरिबी, कौटुंबीक ताणतणाव यातून हा प्रकार घडला असल्याचे महिलेचा पती विठ्ठल सुखदेव कुदळे याने सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com