‘परशा’ असल्याचे सांगत महिलेची फसवणूक
Featured

‘परशा’ असल्याचे सांगत महिलेची फसवणूक

Sarvmat Digital

सायबर सेलकडून आरोपीला अटक; दागिने जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर (परशा) याच्या नावाने फेसबुकला बनावट खाते उघडून अहमदनगर शहरातील महिलेची फसवणूक करणार्‍या पुण्याच्या एकाला अहमदनगर सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. शिवदर्शन नेताजी चव्हाण ऊर्फ शिवतेज (रा. पिंपरी चिंचवड, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. महिलेकडून घेतलेले मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी पोलिसांनी जप्त केली आहे.

एमआयडीसी येथे राहत असलेल्या महिलेने अहमदनगर सायबर सेलकडे 22 मे रोजी तक्रार केली होती. या महिलेचा चार महिन्यापूर्वी फेसबुकवर सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर याच्या बनावट खात्याशी संपर्क आला. पुणे, पिंपरी चिंचवड येथील शिवदर्शन हे खाते हाताळत होता. याच खात्यावरून त्याने अहमदनगरमधील महिलेशी मैत्री वाढवली. अभिनेता आकाश ठोसर म्हणूनच शिवदर्शन याने या महिलेशी फोनवर संभाषण सुरू ठेवले. त्यातून पुढे त्याने आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून पैशाची गरज व्यक्त केली. या महिलेने एवढा मोठा अभिनेता पैसे मागतो आहे, म्हणून लगेचच पैसे देण्याची तयारी दर्शवली. हे पैसे घेण्यासाठी नगरला येतो, असे त्याने महिलेला सांगितले.

आकाश ठोसर स्वतः पैसे घेण्यासाठी येणार म्हटल्यावर महिला हुरळून गेली होती. पण आकाश ठोसर म्हणून बोलत असलेल्या शिवदर्शन याने ऐन वेळेला महिलेला संपर्क साधून मला यायला जमणार नाही, मित्राला पाठवितो, असे सांगितले. परंतु आकाश ठोसर असल्याचे सांगणारा शिवदर्शन स्वतःच नगरमध्ये आला आणि या महिलेकडून दागिने घेवून गेला. दागिने मिळाल्यानंतर शिवदर्शन याने आकाश ठोसरच्या नावाने हाताळत असलेले आणि त्याने तयार केलेले फेसबुकवरील बनावट खाते बंद केले. त्यावरून महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने अहमदनगर सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली.

सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अरूण परदेशी, उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस कर्मचारी योगेश गोसावी, उमेश खेडकर, राहुल हुसळे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर यांनी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह आणि अतिरीक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत शिवदर्शन याला ताब्यात घेत त्याने महिलेकडून घेतलेले दागिने जप्त केले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com