जैन धर्माच्या परंपरेला छेद : तीन युद्धांत सहभागी झालेल्या पतीला पत्नीने दिला मुखाग्नी
Featured

जैन धर्माच्या परंपरेला छेद : तीन युद्धांत सहभागी झालेल्या पतीला पत्नीने दिला मुखाग्नी

Sarvmat Digital

पाथर्डी (प्रतिनिधी)- जैन धर्माच्या परंपरेला छेद देत पाथर्डीत पत्नीने पतीचे अंत्यसंस्कार केले आहेत. जैन समाजातील महिला घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही अंत्यसंस्काराला उपस्थित राहात नाहीत अशी परंपरा आहे. मात्र या परंपरेला छेद देत देशासाठी तीन युद्धांत सहभाग घेतलेल्या पतीचे अंत्यसंस्कार जैन समाजातील 72 वर्षीय छायाबाई गांधी यांनी करत वेगळे धाडस दाखवले.

शहराच्या मोहनवाडी परिसरात राहणारे निवृत्त सैनिक मनसुखजी दानमल गांधी यांचे बुधवारी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मयत मनसुखजी गांधी यांनी लष्करात असताना 1962, 1965 आणि 1971 च्या युद्धात सहभाग घेतला होता. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पाथर्डी येथे राहण्याचे ठरवले. एकमेव अपत्याचाही मृत्यू झाल्याने उपजीविकेचे साधन म्हणून छायाबाई गांधी यांनी स्वेटर विणून विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पत्नीला साथ देताना मनसुखलाल गांधी यांनी सुद्धा स्वतःचे छोटेसे किराणा दुकान चालू केले होते.

बुधवारी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्याने मनसुखलाल यांचा मृत्यू झाला. मनसुखलाल गांधी व छायाबाई गांधी यांना मुलगा व मुलगी नसल्याने त्यांचे अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर छायाबाई यांनी मीच अंत्यसंस्कार करणार असल्याचे नातेवाईकांना सांगितले. काही नातेवाईकांनी विरोध केला, मात्र छायाबाई आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्या नंतर या निर्णयाला जैन समाजातील पंच कमेटी व नातेवाईकांनी मान्यता दिल्यानंतर शहरातील कोरडगाव रोडवरील अमरधाममध्ये त्यांनी आपल्या हाताने पतीच्या चितेला अग्नी दिला.

Deshdoot
www.deshdoot.com