पाणीवापर संस्था मतदारयाद्या पुनर्रचना कार्यक्रम आजपासून सुरू
Featured

पाणीवापर संस्था मतदारयाद्या पुनर्रचना कार्यक्रम आजपासून सुरू

Sarvmat Digital

मुळा उजवा कालवा लाभक्षेत्रातील लघु वितरिका

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – मुळा उजवा कालवाच्या लाभक्षेत्रातील लघू वितरिकास्तरीय पाणी वापर संस्थांच्या व्यवस्थापन समिती संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यामुळे सन 2020 ते 2026 या कालावधीसाठी संचालकपदाची निवडणूक घेण्याचे प्रस्तावित असल्याने सर्व लघू वितरिकास्तरीय पाणी संस्थांच्या मतदार याद्या अद्ययावत (पुनर्रचना) कालबध्द कार्यक्रम सोमवार दि. 2 मे पासून सुरू होत असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकर्‍यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 व नियम 2006 नुसार पाणी व्यवस्थापन करण्यासाठी पाणी वापर संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे.

नगर जिल्ह्यातील राहुरी, नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील लघू वितरीकास्तरीय पाणी वापर संस्थांच्या व्यवस्थापन समिती संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यामुळे सन 2020 ते 2026 या कालावधीसाठी संचालक पदाची निवडणूक घेण्याचे प्रस्तावित असल्याने सर्व लघु वितरीकास्तरीय पाणी संस्थांच्या मतदार याद्या अद्ययावत (पुनर्रचना) कालबद्ध कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे.

मुळा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील 500 हेक्टरच्या आतील क्षेत्र व 9 संचालक संख्या असलेल्या आणि लघु वितरीकास्तरीय 500 हेक्टर क्षेत्राच्या वरील व 12 संचालक संचालक संख्या असलेल्या सर्व लघु वितरीकास्तरीय पाणी वापर संस्थांच्या मतदार याद्या अद्ययावत करण्यात येणार आहेत.

उपरोक्त अधिनियम 2006 मधील प्रकरण 2 नियम 7 (10) नुसार निवडणूक निधी म्हणून प्रत्येक पाणी वापर संस्थेने रक्कम रुपये 35 हजार संबंधित शाखाधिकारी कार्यालयात अंतिम यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी भरायची आहे. निवडणूक नियम व अधिक माहिती सहायक कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे उपविभाग, राहुरी, उपविभागीय अधिकारी, मुळा पाटबंधारे उपविभाग घोडेगाव, उपविभागीय अभियंता, मुळा पाटबंधारे उपविभाग, नेवासा, सहाय्यक अभियंता श्रेणी-1, मुळा पाटबंधारे उपविभाग, चिलेखनवाडी, उपविभागीय अधिकारी, मुळा पाटबंधारे उपविभाग, अमरापूर यांची त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

थकबाकी असणारे सभासद ठरणार अपात्र
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकर्‍यांकडून व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 33 (1) (ग) पाणी वापर संस्थेचे सभासदांकडे पाणी पट्टीची थकबाकी असेल तर असे सभासद पाणी वापर संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा संचालक म्हणून लढविण्यास अपात्र ठरतील. तसेच ज्या पाणी वापर संस्थेकडे पाणी पट्टीची थकबाकी असेल, त्या संस्थेचे विद्यमान संचालक सदस्य देखील निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतील. सदरची थकबाकी ही अंतिम मतदारयादी प्रसिध्द होण्याच्या पूर्वी भरणे बंधनकारक आहे.

कालबद्ध कार्यक्रम
मतदार याद्या तयार करणे (दि. 2 ते 11 मार्च), याद्या प्रसिद्धी व हरकती मागविणे (12 मार्च), हरकती स्वीकारणे (13 ते 15 मार्च), हरकती निकाली काढणे (16 ते 30 मार्च), प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे (7 एप्रिल), प्रारूप यादीवर वरिष्ठ कार्यालयात अपील करणे (14 एप्रिल), अपिलीय अधिकार्‍यांचा निर्णय (15 ते 17 एप्रिल), अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे (20 एप्रिल).

Deshdoot
www.deshdoot.com