847 पाणी योजनांसाठी 200 कोटींचा खर्च
Featured

847 पाणी योजनांसाठी 200 कोटींचा खर्च

Sarvmat Digital

-ज्ञानेश दुधाडे

10 वर्षांतील स्थिती, पाणी योजनांसाठी निधीची मागणी अन् पाणी टंचाई संपेना !

अहमदनगर – जिल्ह्यात 2005-06 ते 2015-16 या 10 वर्षांच्या काळात तीन वेगवेगळ्या कार्यक्रमातून 847 नव्या पाणी योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. या योजनांवर 200 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. असे असताना अजूनही जिल्ह्यात पाणी योजना आणि त्यासाठी निधीची मागणी थांबलेली नाही.

गेल्या 15 ते 20 वर्षांत जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या पाणी योजनांची हिस्ट्रीशीट तयार करण्याचे आदेश असतानाही पाणी पुरवठा विभागाकडून टाळाटाळ होत असून या पाणी योजनांचे मुरलेले पाणी शोधणार कोण, असा प्रश्न समोर आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी योजना, स्वतंत्र पाणी योजनांवर करण्यात आलेला खर्च, त्यानंतर त्यांच्या दुरुस्तीसाठी देण्यात आलेला निधी, त्यातून मिळणारे पाणी आणि संबंधित पाणी योजनांची विद्यमान स्थिती याचा तालुका आणि योजनानिहाय तपशील पाणी पुरवठा विभागाकडे नाही.

दरवर्षी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या मार्फत जिल्ह्यात नव्याने पाणी योजनांची कामे हाती घेण्यात येत आहेत. उदाहारण द्यायचे, तर गेल्या आठवड्यात नगर तालुक्यातील सारोळा कासार या ठिकाणी नव्याने एक कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे भूमिपूजन झाले. मात्र, या ठिकाणी असणार्‍या आधीच्या योजनेचे काय? सारोळा कासार गावाला यापूर्वी कोणत्या योजनेतून पाणी मिळत होते. त्या योजनेचे आता पुढे काय? संबंधीत योजना सुरू राहणार का, ती योजना कधी तयार करण्यात आली होती. त्यावर किती रुपये खर्च झाला होता. संबंधीत योजनेचे आयुष्य संपले की संपवली असे एकना अनेक प्रश्न सारोळ्यासह जिल्ह्यातील अनेक पाणी योजनांसंदर्भात आहेत.

यासाठी पाणी योजनांचे हिस्ट्रीशिट आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी जाहीरपणे जिल्ह्यात पाणी योजनांच्या कामांमध्ये मोठा आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला. अनेक ठिकाणी पाणी योजनेसाठी मंजूर 100 टक्के निधी कागदोपत्री खर्च दाखवून पैसे लाटण्यात आलेले आहेत आणि संबंधीत गाव मात्र पाण्यासाठी वणवण करतांना दिसत आहे. यामुळे त्यांनी पाणी योजनांच्या चौकशीची मागणीही केली. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व योजनांचे शक्य नसल्यास किमान 20 वर्षात तयार झालेल्या पाणी योजनांची चौकशी होवून हिस्ट्रीहिट तयार केल्यास यातील ‘व्यवहार’ समोर येण्याची दाट शक्यता आहे.

जिल्ह्यात गेल्या 15 वर्षात आपलं पाणी योजना, भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, मुख्यमंत्री पेयजल आणि अन्य योजनांमधून पाणी योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. यातील राष्ट्रीय राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम संपला असून केंद्र सरकार नव्याने कार्यक्रम हाती घेणार आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या योजना, त्यावर करण्यात आलेला खर्च त्यांची विद्यमान स्थिती, संबंधीत पाणी योजनेचे आयुष्य याचा कोणताच तपशील जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडे उपलब्ध नाही. तसेच पाच वर्षात राष्ट्रीय पेयजलमध्ये मिळालेला निधी आणि खर्चाचा तपशील देखील जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडे नाही. यामुळे पाणी योजनांच्या कामाविषय मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील पाणी योजनांचे हिस्ट्रीशिट तयार करण्याचा ठराव करण्यात आलेला आहे. हा ठराव मी करण्यास भाग पाडले होते. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हिस्ट्रीशिट तयार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पुढे काहीही झाले नाही.
-राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्य.

10 वर्षांतील पाणी योजना

अकोले – 29 भारत निर्माण, 33 राष्ट्रीय पेयजल, 7 आपलं पाणी एकूण ः 69 योजना.
जामखेड – 73 भारत निर्माण, 25 राष्ट्रीय पेयजल, 5 आपलं पाणी एकूण ः 69 योजना.
कर्जत – 27 भारत निर्माण, 13 राष्ट्रीय पेयजल, 6 आपलं पाणी एकूण ः 46 योजना.
कोपरगावश- 26 भारत निर्माण, 11 राष्ट्रीय पेयजल, 2 आपलं पाणी एकूण ः 39 योजना.
नगर – 22 भारत निर्माण, 30 राष्ट्रीय पेयजल, 4 आपलं पाणी एकूण ः 56 योजना.
नेवासा – 15 भारत निर्माण, 15 राष्ट्रीय पेयजल, 0 आपलं पाणी एकूण ः 29 योजना.
पारनेर – 58 भारत निर्माण, 27 राष्ट्रीय पेयजल, 8 आपलं पाणी एकूण ः 93 योजना.
पाथर्डी – 47 भारत निर्माण, 19 राष्ट्रीय पेयजल, 18 आपलं पाणी एकूण ः 84 योजना.
राहाता – 21 भारत निर्माण, 10 राष्ट्रीय पेयजल, 0 आपलं पाणी एकूण ः 31 योजना.
राहुरी – 21 भारत निर्माण, 27 राष्ट्रीय पेयजल, 4 आपलं पाणी एकूण ः 52 योजना.
संगमनेर – 67 भारत निर्माण, 37 राष्ट्रीय पेयजल, 9 आपलं पाणी एकूण ः 113 योजना.
शेवगाव – 8 भारत निर्माण, 4 राष्ट्रीय पेयजल, 3 आपलं पाणी एकूण ः 18 योजना.
श्रीगोंदा- 56 भारत निर्माण, 16 राष्ट्रीय पेयजल, 26 आपलं पाणी एकूण ः 98 योजना.
श्रीरामपूर-36 भारत निर्माण, 11 राष्ट्रीय पेयजल, 2 आपलं पाणी एकूण ः 49 योजना.
(2005-06 ते 2015-16)

Deshdoot
www.deshdoot.com