पाणीपट्टीत 10 टक्के वाढ; नवीन पाणीपुरवठा योजनेला चालना
Featured

पाणीपट्टीत 10 टक्के वाढ; नवीन पाणीपुरवठा योजनेला चालना

Sarvmat Digital

राहुरी नगरपालिकेचे 74 कोटी 41 लाखाचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- माजी खा. प्रसाद तनपुरे, माजी नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडदौड करणार्‍या राहुरी नगरपरिषदेचे सन 2020 – 21 या आर्थिक वर्षासाठी 74 कोटी 41 लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्षा तथा उपनगराध्यक्षा राधाताई साळवे होत्या. यावेळी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान, या अंदाजपत्रकात पाणीपट्टीत 10 टक्के वाढ करण्यात आली असून नवीन पाणीपुरवठा योेजनेला चालना मिळण्यासाठी सुमारे 35 कोटी रुपये निर्धारित ठेवण्यात आले आहेत. तर शहराच्या विकासकामांसाठीही निधी ठेवण्यात आला असून भूमिगत गटारसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंदाजपत्रकात शहरांतर्गत रस्त्यांसाठीही निधी ठेवण्यात आला आहे.

या सभेत सन 2020 – 2021 साठीचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांनी सादर केले. पाणीपट्टीमध्ये 10 टक्के वाढ करण्यात येणार असून इतर कोणत्याही करात दरवाढ केलेली नाही.

एकूण रक्कम 195.54 रुपये कोटीचे तसेच 74.41 लक्ष रुपये शिलकीचे हे अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले. या अंदाजपत्रकात प्रमुख तरतुदी अशाः एकूण महसुली जमा – 33.44 कोटी, एकूण भांडवली जमा – 154.98 कोटी, एकूण महसुली खर्च- 47.76 कोटी, एकूण भांडवली खर्च – 153.03 कोटी रुपये, वैशिष्ट्यपूर्ण कामाकरिता अनुदान – 5 कोटी, रस्ता निधी 3 कोटी, स्थानिक विकास निधी 5 कोटी, नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) 35 . 00 कोटी ( नविन पाणीपुरवठा योजना), अंतर्गत भूगटार योजना 30 कोटी, विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना 30 कोटी रुपये गृहीत धरण्यात आली आहे.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष दिलीप चौधरी, अनिल कासार, सूर्यकांत भुजाडी, शहाजी जाधव, विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, अक्षय तनपुरे, सौ. अनिता पोपळघट, सौ. राखी तनपुरे, सौ. सुमती भागवत, प्रकाश भुजाडी, नंदकुमार तनपुरे, विक्रम भुजाडी, आदींसह नागरिक उपस्थित होते. अंदाजपत्रक लेखापाल अर्जुन बर्गे, योगेश सर्जे यांनी हे अंदाजपत्रक तयार केले. त्यांना योगेश शिंदे यांनी सहाय्य केले. यावेळी नगरपरिषदेचे सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com