वीरगावकरांनी केले सारे कुटुंब क्वारंटाईन
Featured

वीरगावकरांनी केले सारे कुटुंब क्वारंटाईन

Sarvmat Digital

वीरगाव (वार्ताहर)- लॉकडाऊन कालावधीत मुंबईहून गावाकडे प्रयाण करण्यासाठी आजारी पडण्याचा बहाणा करुन एक कुटूंब अकोले तालुक्यातील वीरगावात आले. ही घटना घाबरलेल्या गावकर्‍यांच्या लक्षात आल्याबरोबर ग्रामपंचायतला तात्काळ ही माहिती मिळाल्याने कुटुंबात आलेले आणि घरी स्थायिक असलेल्या सार्‍यांवरच गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्वारंटाईन होण्याची वेळ आली.

वीरगावातील डॉक्टर मुंबईत एका खासगी दवाखान्यात नोकरीस आहे. पत्नीसह तो मुंबईत वास्तव्यास आहे. त्याची आई वीरगावहून मुंबईला मुलाकडे गेली आणि देशभरात लॉकडाऊन झाल्याने तिकडेच अडकून पडली. दरम्यानच्या काळात गावी येण्याचा प्रयत्न सारी वाहनसेवा बंद झाल्याने रहितच झाला. सोमवारी गावी येण्यासाठी या कुटुंबाने शक्कल लढविली. मुंबईहून रुग्णवाहिकेतून आजारी असल्याचा बहाणा करुन तपासणीचा बहाणा करीत हे कुटुंब मार्गक्रमण करीत गावात आले.संपूर्ण वीरगाव कोरोनाच्या भयाने कडकडीत बंद आहे.

गावात येणारे सारे शिवरस्तेही बंद असून तरुणांनी येणार्‍या प्रत्येकाची चौकशी सुरु केली आहे. गावचा असला तरी बाहेर वास्तव्य करणारास सध्यातरी गावबंदी आहे. या कुटुंबाने मात्र आजारपणाची शक्कल लढवून रुग्णवाहिकेतून गावातल्या घरी प्रवेश केला. काही तासात ही वार्ता गावात पसरल्याने सार्‍यांमध्ये भीती पसरली.
ही वार्ता तातडीने ग्रामपंचायत प्रशासनाला कळल्यानंतर अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे आणि सरपंच नवनाथ कुमकर यांनी तातडीने मुंबईहून आलेले तिघे आणि घरी असणारे दोघे मिळून पाचही जणांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांना क्कारंटाईन केले.आलेल्या रुग्णवाहिकेचा शोध घेतला असता ती वेगाने पसार झाल्याचे कळले.

ही घटना तात्काळ अकोल्याचे तहसिलदार मुकेश कांबळे आणि आरोग्य खात्याला कळविण्यात आली. वेगाने सुत्रे हलल्यानंतर आरोग्य खात्याच्या स्थानिक आरोग्यसेविकेने या कुटुंबाची चौकशी करुन पाचही जणांना क्वारंटाईनचे शिक्के मारुन शाळेतच थांबण्यास सांगितले. त्यांची जेवण व निवासाची व्यवस्था शाळेतच करण्यात आली.

भयभीत झालेल्या वातावरणामुळे ग्रामपंचायतने सदर व्यक्तीचे घर आणि संपूर्ण गावात जंतुनाशकाची फवारणी केली. वीरगावातही त्यांचा दवाखाना आणि मेडिकल असून घरी आल्यानंतर त्यांचा कितीजणांशी संपर्क आला याची चौकशी सुरु आहे. सध्या बाहेरगावच्या कुणालाही अगदी गावचा असला तरी प्रवेश बंद आहे. परंतु झालेल्या घटनेने वीरगावकर हादरुन गेले आहेत. मंगळवारी सकाळी देवठाण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस. एस. नागरे, पर्यवेक्षक मिलींद इंदवे, आरोग्यसेवक पी. बी. महाजन, आरोग्यसेविका एस. बी. हासे, एस. व्ही. आंबरे यांनी या व्यक्तींची तपासणी करुन त्यांना पुढील तपासणीसाठी नगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविले.

रुग्णवाहिकांची तपासणी करा
सर्वत्र संचारबंदी असल्याने बाहेरगावी असणार्‍या अनेकांना वाहने मिळत नाहीत. पर्यायाने अनेकजण अडकून पडले आहेत. त्यातच खोटा बहाणा करुन रुग्णवाहिकेचा वापर प्रवासासाठी करण्यात येतो. रुग्णवाहिकेला पोलिसही अडवत नसल्याने यामुळे प्रसंगी भरपूर पैसे मोजून गावांमध्ये येण्यासाठी या सुरक्षित प्रवासाचा प्रयत्न सर्वत्र होऊ शकतो. रस्त्यावर धावणार्‍या रुग्णवाहिकांचीही आता तपासणी होणे गरजेचे आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com