Wednesday, April 24, 2024
Homeनगरदहा गावांचे सरपंच-उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांचे उपोषण

दहा गावांचे सरपंच-उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांचे उपोषण

जामखेड तालुक्यातील गावांमध्ये टँकर सुरू करण्याची मागणी; आश्वासनानंतर उपोषण मागे

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – जवळा जिल्हा परिषद गटातील दहा गावांत अत्यल्प पाऊस पडल्यामुळे महिनाभरापासून पाणीपुरवठा प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. प्रशासनाला याबाबत महिनाभरापासून टँकरची मागणी केली आहे. तसेच वरीष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पाणी उपलब्ध नसल्याचे दाखले दिले. तरी कर्जत उपविभागीय अधिकारी यांनी टँकरचे प्रस्ताव फेटाळले. यामुळे पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दहा गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपोषणास बसले होते. अखेर गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.

- Advertisement -

पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे म्हणाले, जवळा गटातील दहा गावच्या सरपंच व ग्रामस्थांनी टंचाई शाखेला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केली होती. तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील पिंपरखेड, हळगाव, अरणगाव, फक्राबाद, डोणगाव, धानोरा, बावी व चोंडी गावात मागील वर्षी झालेल्या पावसाळ्यात अवघा 182 मि. मि. पाऊस पडला आहे. याची शासन दप्तरी नोंद आहे. कमी पाऊस असल्यामुळे या परिसरातील फळबागांना शेतकरी टँकरने पाणीपुरवठा करित आहे.

चोंडी बंधारा कोरडेठाक पाडल्यामुळे या बंधार्‍यावरून पाणीपुरवठा करणारे सर्व प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. याबाबत प्रांत कार्यालयाला प्रस्ताव पाठवून ही त्याची दखल न घेता अजून टंचाई जाहीर झाली नाही, असे प्रांतकडून उत्तर दिले जात असल्याचे पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे यांनी सांगितले. तसेच कुकडीचे चालू आवर्तनात चोंडी बंधार्‍यात पाणी सोडल्यास सात गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो असे सरपंच ढवळे म्हणाले.

माजी पंचायत समिती सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे, उपसरपंच शहाजी म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य राजू ओमासे, फैयाज शेख, बाबासाहेब ढवळे, बापू शिंदे, संतोष कारंडे, राहुल चोरगे, बाळू कारंडे, भागवत ओमासे, शहाजी आधुरे, अरणगावचे सरपंच लहू शिंदे, धानोरा सरपंच बाळासाहेब तुपेरे, फक्राबाद सरपंच विश्वनाथ राऊत, डिगांबर जगताप, नानासाहेब आढाव, हळगाव सुरेश ढवळे, आबासाहेब ढवळे, गणपत ढवळे, ग्रामस्थ, डोणगाव सरपंच सचिन डोंगरे, कवडगाव, बावी, खांडवी, डिसलेवाडी, चोंडीचे सरपंच पांडुरंग उबाळे, सारोळा सरपंच व भाजप तालुका अध्यक्ष अजय काशीद या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपोषणास बसले होते.

सलग चार तास उपोषण सुरू होते. अखेर या उपोषणाची प्रशासनाने दखल घेऊन गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांनी दिलेल्या लेखी पत्रात म्हटले की पंचायत समिती कार्यालया कडून सद्यस्थितीत विहिरी अधिग्रहणाचे पाच व टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण सात प्रस्ताव प्राप्त झाले आहेत; परंतु सदर गावात टंचाई घोषित करणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव कर्जत उपविभागीय अधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे टंचाई घोषित झाल्यानंतर तातडीने टँकर सुरू करण्याची कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या