नगर : विळदच्या मतदार यादीतील घोळ मिटवा
Featured

नगर : विळदच्या मतदार यादीतील घोळ मिटवा

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील विळद ग्रामपंचायतीसाठी येत्या 29 मार्चला मतदान होणार आहे. मात्र, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीत अनेक चुका आणि घोळ आहेत. अशा परिस्थितीत मतदान प्रक्रिया घेणे उचित नसल्यामुळे आधी मतदार यादी दुरूस्त करून त्यानंतर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी गावातील मतदारांनी केली आहे.

विळद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली आहे. मात्र, यादीत अनेक त्रुटी आणि चुका आहेत. याचा फटका निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. यामुळे आधी मतदार यादी दुरूस्तीची मागणी करण्यात आली आहे.

सध्याच्या सदोष मतदार यादीनुसार मतदान झाल्यास त्यावर आक्षेप घेण्याची तसेच निवडणुकीनंतर पेच निर्माण होण्याचीही शक्यता आहे. यामुळे निवडणूकीपूर्वी मतदार याद्यातील त्रुटी काढणे आवश्यक आहे. अन्यथा काही मतदारांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे जिल्हा निवडणूक शाखा आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या विळदच्या अंतिम मतदार यादीत एकाच मतदाराला वेगवेगळे अनुक्रमांक देण्यात आले आहेत. तसेच मृत मतदारांची नावे देखील छापण्यात आली आहेत. त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्यामुळे तसेच निवडणूक लढणार्‍या उमेदवारांना याचा फटका बसू नये यासाठी प्रशासनाने मतदार यादी लवकरात-लवकर अद्ययावत करावी व निवडणूक यादीवरून गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यावी.
– कैलास अडसुरे, ग्रामपंचायत सदस्य

निवडणूक प्रक्रियेतील सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक म्हणजे मतदार आहे. मतदारांच्या एका-एका मताला महत्व असून मृत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे विळदच्या यादीतून कमी करण्यात यावीत त्याचबरोबर विवाह झालेल्या मुलींचे नाव दुबार (दोन गावांत) असल्यास एक रद्द करण्यात यावे जेणेकरून बोगस मतदान होणार नाही.
– कैलास शिंदेे, मतदार

Deshdoot
www.deshdoot.com