पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध
Featured

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

Sarvmat Digital

लोणी (प्रतिनिधी)- आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखल्या जाणार्‍या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक सलग तिसर्‍यांदा बिनविरोध झाली असून माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 21 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. यामध्ये अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विखे गटाकडून 37 व विरोधी गटाकडून 2 असे एकूण 39 अर्ज दाखल झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली यामध्ये विरोधी गटाचे 2 अर्ज बाद झाले होते.

अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 16 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने 21 संचालकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचाही यंदाच्या संचालक मंडळात समावेश आहे. गटनिहाय बिनविरोध निवडून आलेले संचालक खालीलप्रमाणे.. गट नंबर 1 मध्ये कैलास सूर्यभान तांबे, डॉ.दिनकर गणपत गायकवाड, गट नं.2 मध्ये अ‍ॅड. भानुदास लहानु तांबे, देविचंद भारत तांबे, गट नं. 3 मध्ये विश्वास केशवराव कडु, उत्तम रामभाऊ दिघे, गट नं.4 मध्ये आ.राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील, दादासाहेब चंद्रभान घोगरे, संजय सोपान आहेर, गट नं.5 मध्ये धनंजय बाबासाहेब दळे, स्वप्निल सुरेश निबे, दत्तात्रय साहेबराव खर्डे, गट नं.6 मध्ये साहेबराव जिजाबा म्हस्के, सतीश शिवाजीराव ससाणे, संपत भाऊराव चितळकर, महिला राखीव गटामध्ये सौ. उज्वला अशोक घोलप, सौ. संगीता भास्कर खर्डे, भटक्या विमुक्त जाती मध्ये शांताराम गेणू जोरी, अनुसूचित जाती मध्ये बाबू फकीरा पलघडमल, इतर मागास प्रवर्गात सुभाष नामदेव अंत्रे आणि ब वर्ग सभासदांमध्ये रामभाऊ शंकरराव भुसाळ या उमेदवारांचा समावेश आहे.

संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सर्व नवनियुक्त संचालकांनी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना कार्यस्थळावरील सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी दिलेला सहकार चळवळीचा वारसा प्रवरा परिसराने सदैव जोपासला. पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा जो संस्कार सर्व कार्यकर्ते आणि सभासदांना दिला त्याच विचाराने या परिसराच्या विकासासाठी नवनियुक्त संचालक मंडळ कार्यरत राहील आणि सभासदांचा विश्वास सार्थ ठरवेल. या निवडणुकीच्या निमित्ताने कारखान्याचे सभासद, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी निवडणूक प्रक्रीया बिनविरोध होण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आमदार विखे पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com