Tuesday, April 23, 2024
Homeनगरविकास मंडळाच्या सभेकडे शिक्षकांची पाठ

विकास मंडळाच्या सभेकडे शिक्षकांची पाठ

 अध्यक्ष शिंदे यांच्या कामाचे विरोधकांकडून कौतुक : सर्वांना सोबत घेण्याचा सल्ला

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा शिक्षक बँकेचे सभासद असणार्‍या जिल्हा प्राथमिक विकास मंडळाची सर्वसाधारण सभा शनिवारी नगरला पार पडली. सुमारे साडे अकारा हजार सभासद असणार्‍या प्राथमिक शिक्षकांपैकी अवघ्या 100 ते 125 सभासदांनी या ठिकाणी हजेरी लावली. यात 16 विश्वस्त होते. या सभेत विरोधकांनी मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. मात्र, विकास मंडळाचा विकास करताना विरोधी मंडळाच्या सभासदांना विश्वासात घेण्याचाही सल्ला दिला.

- Advertisement -

नगर शहरात मध्यवर्ती भागात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक सभासद असणारे विकास मंडळ अस्तित्वात आहे. या ठिकाणी मंडळाची 72 गुंठे जागा असून या ठिकाणी सध्या 13 ते 14 कोटी रुपये खर्च करून नाट्यगृह, गाळे, विद्यार्थ्यासाठी राहण्यासाठी वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे.

या कामाचा आढावा मंडळाचे अध्यक्ष शिंदे यांनी सभासदांसमोर मांडला. गेल्या चार वर्षात विकास मंडळाच्या जागेबाबत महापालिका, आयकर विभाग, महसूल विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित असणारे विषय संपवितांना झालेला त्रास आणि त्यासाठी अतिशय अल्प मोबदल्यात करण्यात आलेले उपायांची माहिती यावेळी देण्यात आली. या ठिकाणी नाट्यगृह उभारणीसाठी निधीची आवश्यकता असून जिल्ह्यातील शिक्षकांकडून काही प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला असला तरी उर्वरित निधीसाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. तसेच गेल्या पाच वर्षात अल्प मानधन, पदरमोड करत विश्वस्त मंडळाने केलेले काम याची माहिती दिली. यासह हा प्रकल्प उभा करण्यासाठी आलेले कष्ट आणि अनुभवांचे कथन करण्यात आले.

दरम्यान, गुरूकुल मंंडळाचे नेते संजय कळमकर यांनी मंडळाचे अध्यक्ष शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. पण पारदर्शी कारभारासाठी सर्वसामान्य शिक्षकांना विश्वासत घेवून काम केले असते, तर आणखी बरे झाले असते. या ठिकाणी कारभार स्वच्छ असला तरी जिल्ह्यातील शिक्षकांना अंधारात का ठेवता, असा सवाल उपस्थित केला. यावेळी संजय धामणे यांनी शिक्षक बँकेतील एका कर्मचार्‍याच्या कुटूंबाच्या सोईसाठी बँकेतील तांबे आणि रोहकले गट एकत्र आल्याचा आरोप केला. तर प्रविण ठूबे यांनी शिक्षक बँक विकास मंडळाला अर्थसाह्य करणार असल्याने तांबे आणि रोहकले गट एकत्र आला.

मात्र, आठ दिवसांत बँकने विकास मंडळाला मदत न केेल्यास बँकेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा त्यांनी दिला. कैलास चिंधे यांनी नगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास विकास मंडळातील उत्तरेचा वाटा उत्तर जिल्ह्याला देण्याची मागणी केली. ज्येष्ठ नेते रावसाहेब रोहकले यांनी विकास मंडळाच्या वास्तूसाठी ते विकास मंडळात लक्ष देत आहेत. शिक्षकांची भव्य वास्तू उभी राहवी, अशी आपली इच्छा आहे. यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, साडे अकारा हजार सभासद असणार्‍या प्राथमिक शिक्षकांपैकी अवघ्या 100 ते 125 सभासदांनी या ठिकाणी हजेरी लावली. यात देखील 16 विश्वस्त होते. यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी सर्वसाधारण सभेकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाहवसाय मिळाले. यावेळी रोहकले, कळमकर, चिंधे, धामणे, ठुबे, संजय शेळके, शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष नानासाहेब बडाख, संचालक अविनाश निंभोरे, रा.या. औटी, सुनील पवळे, कल्याण राऊत, विकास डावखर, सुदर्शन शिंदे, एकनाथ व्यवहारे, सुरेंद्र आढाव, कल्याण पोटभरे, सर्जेराव घोडके, मोहनराव राशिनकर, अविनाश साठे, राजाभाऊ पालवे, संजय उदार, गोरक्षनाथ देशमुख, मच्छिंद्र कोल्हे, गोकुळ गायकवाड, कल्याण कोकाटे, पांडूरंग खराडे, लक्ष्मण सोनवणे, रमेश दरेकर, भाऊसाहेब ढोकरे, रमेश धोंगडे, सुनंदा आडसुळ, आदी उपस्थित होते.

लालटाकीच्या जागेत नव्याने उभ्या राहणार्‍या संकूलातील गाळे हे प्राधान्याने जिल्ह्यातील शिक्षकांना द्या. विकास मंडळाची निवडणूक बिनविरोध करा. मी पण सोडला तर जिल्ह्यातील शिक्षक कोट्यावधी रुपये उपलब्ध करतील, असे संजय कळमक म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या