भाजीपाला, फळे रेल्वेद्वारे पाठविता येणार
Featured

भाजीपाला, फळे रेल्वेद्वारे पाठविता येणार

Sarvmat Digital

कृषी उपसंचालक नलगे : नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांना आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची रेल्वेद्वारे वाहतूक करता येणार आहे. त्यामुळे रेल्वेद्वारे भाजीपाला आणि फळे अन्य शहरात पाठवता येणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेने व्यवस्था केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आता दुसर्‍या शहरात भाजीपाला पुरवठा करता येणार असल्याची माहिती कृषी उपसंचालक विलास नलगे यांनी दिली.

जीवनावश्यक वस्तू वाहतुकीसाठी रेल्वेद्वारे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी गटांना त्यांचा भाजीपाला दुसर्‍या शहरात पाठविणे शक्य होणार आहे. लॉकडाऊन होण्याआधी जिल्ह्यातील शेतकरी देशातील अन्य शहरात भाजीपाला पाठवत होते. मात्र, त्यानंतर करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन केले.

त्यामुळे दुसर्‍या शहरात भाजीपाला व फळे पाठवणे शक्य होत नव्हते. पर्यायाने शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. आता मात्र, जीवनावश्यक वस्तू वाहतुकीसाठी रेल्वे सुरू करण्यात आली आहे. काही ठिकाणी रेल्वे या पद्धतीने वाहतूक करत आहे. जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी गटांना या निर्णयाची कृषी विभाग माहिती देत आहे.

जिल्ह्यातील शेतकरी गट भाजीपाला आणि फळे दुसर्‍या शहरात पाठवण्यास तयार असतील आणि त्या शहरात सुद्धा रेल्वे वाहतूक होत असेल तर, त्यांनी जिल्हा कृषी विभाग किंवा रेल्वे विभागास संपर्क साधावा, असे आवाहन नलगे यांनी केले आहे. जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना या निर्णयाबाबत माहिती द्यावी, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.

रेल्वेव्दारे कृषी माल, भाजीपाला पाठवायाचा असल्यास त्यासाठी किमान एक बोगी भरेल एवढ्या मालाची आवश्यकता आहे. एक बोगी अथवा त्यापेक्षा जास्त बोगी असा माल तयार असणार्‍यांनी कृषी अधिकारी अथवा क्षेत्रीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच रेल्वेद्वारे पाठवण्यासाठी माल पोहच होणार्‍या स्टेशनवर खरेदीदार व व्यापार्‍यांना माल घेण्याची तयारी असल्यास वाहतूकदार म्हणून शेतकर्‍यांच्या मालाची वाहतूक रास्त दरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे रेल्वे विभागाने कळविले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com