Friday, April 26, 2024
Homeनगरभाजीपाला आणि फुलांचा बाजार बहरण्याची शक्यता

भाजीपाला आणि फुलांचा बाजार बहरण्याची शक्यता

वीरगाव (वार्ताहर)- कोव्हिड 19 च्या कहरात समूळ उच्चाटन झालेला भाजीपाला आणि झेंडूची फुले जून-जुलैत शेतकर्‍यांच्या हाती चांगली अर्थप्राप्ती करुन देतील असा जाणकार शेतकर्‍यांचा अंदाज आहे. करोनाचे संकट आले आणि मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले. सार्‍या बाजारपेठा बंद झाल्याने भाजीपाल्याची पिके आणि झेंडूची शेती जागेवरच थांबली.हजारो-लाखोंचा उत्पादन खर्च करुन बहरास आलेल्या शेतीने शेतकर्‍यांच्या अर्थप्राप्तीची सारी स्वप्ने धुळीस मिळविली.

मागच्या वर्षीच्या समाधानकारक पावसाळ्यामुळे पाण्याची उपलब्धता उन्हाळ्यातही टिकली. भाजीपाला आणि झेंडूच्या फुलांना बाजारभाव मिळतील या आशेने पिकांंच्या उभारणीचा खर्चही मुक्तहस्ते झाला. हातातोंडाशी आलेली पिके करोनाच्या कहरात मात्र मातीमोलच ठरली. आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांवर अधिकची भर करोनाने टाकली.

- Advertisement -

भाजीपाला आणि झेंडूची फुले करोनाने लॉकडाऊननंतर एकाच दिवसात शून्य किंमतीवर आणली. करोना संकटाच्या आदल्याच दिवशी झेंडू 40 रुपये प्रतिकिलो होता. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, भेंडी, ढोबळी मिरची यासारखी इतरही भाजीपाल्याच्या पिकांना किमान 40 ते 50 रुपयांचा प्रतिकिलोपर्यंत बाजारभाव होता. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मात्र आजतागायत या सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले.

जवळपास सर्व शेतकर्‍यांनी या सर्व वाणांचे मोफत वाटप करुन शेती रिकामी करण्याचे धोरण अवलंबले.गुढीपाडवा, लग्नसराई, इतर समारंभांसाठी तयार झालेल्या झेंडूवर रोटाव्हेटर फिरला.लॉकडाऊननंतर भाजीपाला आणि फुलशेतीची तोडणीच बंद झाली. आता हळूहळू परिस्थिती बदलू पाहते आहे. फुकट वाटावा लागलेला भाजीपाला 8 ते 10 रुपये प्रतिकिलो आणि टोमॅटो 12 ते 15 रुपयेपर्यंत वधारला आहे. झेंडूलाही सध्या 30 रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळतो.अर्थात भाजीपाला आणि झेंडूची शेती रिकामी झाल्याने मागणी प्रमाणे पुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने बाजारभावांची सुधारणा होत असावी.

आता हळूहळू बाजारपेठा माणसांनी फुलू लागल्या आहेत. रस्त्यावरुनही वाहनाची चाके फिरु लागली. त्यामुळे बाजारभावाचा आलेख कदाचित वाढताच राहील. जुन-जुलै महिन्यात तोडणीयोग्य असणारा साराच भाजीपाला चांगला भाव खाईल आणि शेतकर्‍यांना चांगली अर्थप्राप्ती करुन देईल असा आशावाद कृष्णकांत थोरात, सोमनाथ कुमकर या शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे.

शेतकर्‍यांचे भय संपणार नाही
करोनाने आता ग्रामीण भागात पाय पसरायला सुरुवात केल्याने शेतकरी अधिक प्रमाणात भयभीत आहे. करोनाचा कहर टिकूनच राहिला तर भाजीपाला आणि फूलशेती तोट्यात घालून पुन्हा कर्जबाजारी व्हायचे का? असा मनोमन सवाल प्रत्येक शेतकर्‍याला आहे. त्यातून भाजीपाला शेती उभारावी कि नको या द्विधा मनस्थितीत अनेकजण आहेत. या मानसिकतेचा परिणामही भविष्यात भाजीपाला उत्पादनावर होणार असल्याने कमी वस्तूंचा पाठलाग जास्त पैसे करतील आणि भाजीपाल्याची महागाई वाढेल हे मात्र नक्की!

- Advertisment -

ताज्या बातम्या