‘एमआयएम’चे वारीस पठाण यांच्या पुतळ्याला मारले जोडे
Featured

‘एमआयएम’चे वारीस पठाण यांच्या पुतळ्याला मारले जोडे

Sarvmat Digital

कठोर कारवाईची मागणी; भाजप, शिवसेना, मनसेचे आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी) –  एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद शनिवारी नगरमध्येही उमटले. भाजप, शिवसेना आणि मनसेने याचा तीव्र निषेध करत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारले, तसेच पुतळा जाळण्यात आला.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या नेतृत्वाखाली जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून वारीस पठाण यांच्या बेताल व्यक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुचाकी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वारीस पठाण यांच्या प्रतिमेस चपला मारून प्रतिमेचे दहन केले. तसेच वारीस पठाण यांच्यावर कायदेशीर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसे निवेदन तहसीलदार उमेश पाटील यांना दिले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) अरुण मुंडे, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर, सुनील रामदासी, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, महिला बालकल्याण सभापती लता शेळके, नगरसेवक रवींद्र बारस्कर, वसंत लोढा, अजय चितळे, पंकज जहागीरदार, सतीश शिंदे, वसंत राठोड, गौतम दिक्षित, सचिन पारखी, नरेंद्र कुलकर्णी, दत्ता हिरणवाळे आदी उपस्थित होते. यावेळी महेंद्र गंधे म्हणाले, वारीस पठाण यांनी हिंदू मुस्लीम समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे चिथवणीखोर वक्तव्य केले आहे.

याचा भारतीय जनता पार्टी निषेध करत आहे. यावेळी लोढा, अ‍ॅड. अगरकर, महापौर वाकळे यांची भाषणे झाली. आंदोलनात अनिल गट्टाणी, सुहास मुळे, महावीर कांकरिया, शिवाजी दहीहंडे, जगन्नाथ निंबाळकर, अन्वर खान, बाळासाहेब गायकवाड, धनंजय जामगावकर, शाकीर सय्यद, संजय ढोणे, विवेक नाईक, उमेश साठे, उदय कराळे, विलास ताठे, महेश नामदे, गणेश साठे, सोमनाथ चिंतामणी, राजेंद्र घोरपडे, सचिन चोरडिया, संतोष शिरसाठ, प्रकाश सैदर, शरद मुर्तडक आदी सहभागी झाले.

शिवसेनेने पुतळा जाळला
एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शिवसेनेने दहन केले. तसेच त्याला जोडे मारले. यावेळी वारीस पठाण मुर्दाबाद, पाकिस्तान को भेज दो, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. चितळे रस्त्यावरील नेता सुभाष चौकात हे आंदोलन झाले. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पठाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. त्यांनतर हा पुतळा जाळून पठाण त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, दत्तात्रय कावरे, संतोष गेनप्पा, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, शशिकांत देशमुख, रमेश खेडकर, मदन आढाव, पप्पू भिंगारदिवे, गणेश झिंजे, शिवसैनिक व पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी राठोड यांनी आपल्या भाषणात वारीस पठाण यांच्यावर टीका करताना ते गद्दार असल्याचे म्हणत अशा व्यक्तीला या देशांमध्ये राहण्याचा अधिकार नाही. त्याला पाकिस्तानमध्ये पाठवून द्या, असे सांगितले. पाकिस्तानमध्ये हिंदू अशा प्रकारचे वक्तव्य करू शकतो का, असा सवालही त्यांनी केला.

पोलिसांत तक्रार
भाजप नेते वसंत लोढा यांनी आंदोलनानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन वारीस पठाण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत तसा तक्रार अर्ज दाखल केला. अशा चिथावणीखोर वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. हे प्रकरण गंभीर असून, पठाण यांच्यावर कठोर कारवाईची मागणी लोढा यांनी आपल्या तक्रार अर्जात केली आहे.

‘मनसे’चेही आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या फोटोस जोडे मारून पुतळा दहन केला. तसेच पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली. महात्मा गांधी पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. भारत हा सर्व जातिधर्मांत गुण्या गोविंदाने नांदणारा देश आहे. हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र राहतात. राष्ट्रीय एकतेला धोका पोहचविण्याचे काम पठाण सारखे देशद्रोही करत असतात. अशा देशद्रोह्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी. हिंदू-मुस्लीम दंगलीला ते प्रोत्साहित करत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलनात मनसे नेते सचिन डफळ, नितीन भुतारे, मनोज राऊत, इंजि. विनोद काकडे, रतन गाडळकर, गणेश शिंदे, गणेश मराठे, अंबादास गोटीपामूल, अभिनव गायकवाड आदी सहभागी झाले होते.

Deshdoot
www.deshdoot.com