Thursday, April 25, 2024
Homeनगरवांबोरी चारीला इतिहासात पहिल्यांदाच हक्काचे पाणी

वांबोरी चारीला इतिहासात पहिल्यांदाच हक्काचे पाणी

आम्ही पाणी देणारे आहोत, अडवणारे नाही- ना. प्राजक्त तनपुरे

तिसगाव (वार्ताहर)- वांबोरी चारी योजनेअंतर्गत येणार्‍या राहुरी नगर पाथर्डी नेवासा तालुक्यातील 43 गावांमधील 102 पाझर तलावात इतिहासात पहिल्यांदाच हक्काचे 680 एमसिप्टी पाणी यावर्षी आम्ही दिले असून यापूर्वी कधीही एप्रिल महिन्यात वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे काम झाले नाही मात्र एप्रिल महिन्यातही बोनस म्हणून काही दिवस वांबोरी चारीला पाणी सोडून राहुरीकर पाणी आडवणारे नसून पाणी देणारे आहेत. त्यामुळे उगाच सोशल मीडियाद्वारे विरोधकांनी जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये अशा स्पष्ट शब्दात नामदार प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेद्वारे त्यांच्यावर टिकास्त्र सोडले.

- Advertisement -

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे पत्रकारांशी संवाद साधतांना ना. तनपुरे म्हणाले, मागील दहा वर्षात निव्वळ वांबोरी चारीचे बटन दाबून फोटोसेशनचे काम करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र किती लाभधारक तलावात पाणी पोहोचले याची कधीही माहिती घेतली नाही. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करत राहिले. आम्ही मात्र या योजनेचा पूर्णपणे अभ्यास केला त्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन, तसेच योजनेवर काम करणारे कर्मचारी या सर्वांना विश्वासात घेऊन मढीपर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम केले.

दहा वर्षात पहिल्यांदा पूर्ण दाबाने शंभर दिवस 680 एमसिप्टी पाणी उचलून लाभधारक तलावापर्यंत पोहोचवले. यापुर्वी देखील अनेक वेळा मुळा धरण ओव्हरफ्लो झाले मात्र त्यावेळेस सत्येत असणार्‍यांना का नाही शंभर दिवस 680 एमसीप्टी पाणी वांबोरी चारीला देता आले. इतिहासात पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात वांबोरी चारीला पाणी देऊन या शेतकर्‍यांमध्ये आम्ही एक विश्वास निर्माण केला. पाण्यासारख्या प्रश्नात राजकारण करण्याची माझी इच्छा नाही मात्र कार्यकर्त्यांच्या आडून सोशल मीडियाद्वारे टीका करण्याचा केविलवाना प्रयत्न विरोधक करत आहेत.

तुमच्या नाकर्तेपणामुळेच या मतदारसंघातील जनतेने आम्हाला भरभरून मते देऊन या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिली आहे. टंचाईची परिस्थिती लक्षात घेता राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार जयंत पाटील यांच्याकडून विशेष परवानगी घेऊन एप्रिल महिन्यातही फुटबॉल उघडा पडेपर्यंत वांबोरी चारीला पाणी सोडण्याचा प्रयत्न केला आणि चाळीस तलावापर्यन्त पाणी पोहचवले.

कोरोणा संसर्गामुळे काही दिवस मागे पुढे झाले. मुख्यमंत्र्यांनी घरी थांबूनच यंत्रणा हाका असे सांगितले असतांना देखील मुंबईला जावून खासबाब म्हणून वाढीव काही दिवस वांबोरी चारीला पाणी देण्याची परवानगी आणली. यापूर्वी दहा वर्षात कधीही हक्काचे शंभर दिवस पाणी मिळाले नाही बोनस पाणी मिळण्याचा तर प्रश्न आला नाही, असे नामनार तनपुरे यांनी आवर्जुन सांगितले. यावेळी युवानेते अमोल वाघ, राजू शेख उपस्थित होते.

ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…
वांबोरी चारीचा पूर्ण अभ्यास मी चारच महिन्यात केलाय. पुढच्या वर्षी तिसगाव, मीरी या भागाला विशेष प्राधान्य देत त्यांची देखील तहान भागवण्याचे काम केले जाणार आहे. या योजनेतील एकही तलाव, गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घेवू. ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’ अशा शब्दात ना. तनपुरे यांनी पाण्याबाबत शेतकर्‍यांना विश्वास दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या