Friday, April 26, 2024
Homeनगरचारच गावांनी भरली वांबोरी चारीची पाणीपट्टी; 39 गावांनी केले हात वर

चारच गावांनी भरली वांबोरी चारीची पाणीपट्टी; 39 गावांनी केले हात वर

करंजी (वार्ताहर) – राहुरी, नगर, पाथर्डी, नेवासा तालुक्यातील 43 गावांमधील 102 तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या वांबोरी पाईप लाईन योजनेची पावणेतीन कोटी रुपये पाणीपट्टी थकली असून त्यापैकी 19 टक्के रक्कम म्हणजे 50 लाख रुपये गोळा करून लाभधारक शेतकर्‍यांनी भरायचे आहेत मात्र 43 गावांपैकी चार गावांनी पैशाची जमवाजमव केली असून उर्वरीत 39 गावांनी पाणीपट्टी भरण्याबाबत वर हात केल्याने मुळा धरणातून वांबोरीचारीला पुन्हा पाणी सुटण्याची शक्यता मावळलीच म्हणावी लागेल.

यावर्षी मुळा धरणातून कधी नव्हे एवढ्या प्रमाणात वांबोरी चारीसाठी पाणी सोडण्यात आले. वांबोरी चारीचे पाणी थेट मढीपर्यंत पोहोचले. अनेक तलावात बर्‍यापैकी पाणी पोहचले. यावर्षी पहिल्यांदाच 680 एमसिप्टी पाणी मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी मिळाले त्यामुळे लाभधारक शेतकर्‍याकडून पाणीपट्टी वसूल करण्यासाठी हातभार लागेल, अशी अपेक्षा मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी देखील व्यक्त केली होती. मात्र यावर्षी देखील लाभधारक शेतकर्‍याने पाणीपट्टी भरण्यास उदासीनता दर्शविल्याने सुमारे पावणे तीन कोटी रुपये पाणीपट्टी थकवली आहे. पाणीपट्टी भरण्यास शेतकरी पुढे येत नसल्याने वांबोरी चारीचे पाणी मुळा धरणातून पुन्हा सुटेल, अशी शक्यता आता मावळली आहे.

- Advertisement -

वांबोरी चारीचे पाणी मढीपर्यंत पोहोचण्यासाठी आमदार, खासदार, मंत्री महोदय सर्वांनीच मोठे प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना देखील यश आले; परंतु पाणीपट्टी भरण्याबाबत लाभधारक शेतकर्‍यांनी वरहात केल्याने पाणीपट्टीचा पावणेतीन कोटीच्या घरात जाऊन पोहोचला आहे. राहुरी, नगर, पाथर्डी, नेवासा तालुक्यातील 45 गावांपैकी पाथर्डी तालुक्यातील सातवड, करंजी, भोसे, कवडगाव आठरे या चार गावांनी पाणीपट्टी भरण्याची तयारी दर्शवली असून या चार गावांमधून चार लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली असल्याची माहिती वांबोरी चारी कृती समितीचे अध्यक्ष अरुणराव आठरे यांनी दिली आहे. त्यामुळे उर्वरित गावांमधून पाणीपट्टी वसूल करण्याचे मोठे आवाहन या कृती समिती समोर उभे राहिले आहे.

ज्या लाभधारक तलावामध्ये वांबोरी चारीचे पाणी पोहोचले आहे. त्या लाभधारक शेतकर्‍यांनी प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरून वांबोरीचारी कृती समितीला सहकार्य केले पाहिजे. पाणीपट्टी भरली तरच ही योजना पुन्हा सुरळीतपणे सुरू राहील, त्यामुळे शेतकर्‍यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.
-अरुणराव आठरे, अध्यक्ष, वांबोरी चारी कृती समिती.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे वांबोरी चारीसाठी यावर्षी 680 एमसीप्टी पाणी मिळाले. अनेक तलावात यावर्षी बर्‍यापैकी पाणीपुरवठा झाला. पाणी मढीपर्यंत पोहचले. ज्यांना पाणी मिळाले त्यांनी थोड्याफार प्रमाणात पाणीपट्टी भरण्यास हातभार लावला पाहिजे तरच पुन्हा पाणी सोडणे शक्य होईल.
– संभाजी पालवे, माजी सभापती

- Advertisment -

ताज्या बातम्या