वडझिरे गोळीबार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांना चकवा

वडझिरे गोळीबार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांना चकवा

जावयाने केली होती सासूची हत्या, शोधासाठी सहा पथके

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे जावयाने सासूवर गोळीबार करून सासूची हत्या केली. ही घटना 17 फेब्रुवारीला रात्री घडली. याप्रकरणी पारनेर तालुका पोलीस ठाण्यात मयत सविता गायकवाड यांचे मेहुणे संतोष उबाळे यांच्या फिर्यादीवरून गोळीबार करणारा राहुल गोरख साबळे (रा. रांधे ता. पारनेर) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गोळीबार करून पसार झालेला आरोपी साबळे पोलिसांना चकवा देत असून आठ दिवस झाले तरी तो सापडत नसल्याने पोलीसही हतबल झाले आहेत.

साबळे याचा विवाह अस्मिता गायकवाड सोबत झाला होता. परंतु, काही दिवसांपासून राहुल व अस्मिता वेगळे राहत होते. राहुल सोबत नांदण्यास जायचे नाही असा जबाब अस्मिताने पोलिसांना दिला होता. यामुळे अस्मिता आई सविताकडे राहत होती. पोलिसांनी राहुल याला समज देऊन प्रकरण मिटविण्यात आले होते.

मात्र, यानंतर राहुल अस्मिताशी संपर्क करत असे. राहुल याने 17 फेब्रुवारीला दुपारी अस्मिताशी मोबाईलवरून संपर्क साधला होता. यामुळे अस्मिताच्या आईने राहुल त्रास देत असल्याची तक्रार पारनेर पोलीस ठाण्यात दिली होती. सासूने आपल्याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची कुणकुण राहुलला लागली. त्याने 17 फेब्रुवारीला रात्री वडझिरे येथे जाऊन तक्रार दिल्याच्या रागातूून सासू सविता गायकवाड यांना बंदुकीतून गोळ्या घातल्या. यात सविता यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी राहुल विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तपासाची चक्रे फिरवली. परंतु, या घटनेला आठ दिवस झाले तरी पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले नाही. स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. परंतु, अद्याप आरोपीचा ठावठिकाणा पोलिसांना लागलेला नाही.’

गोळीबार केल्यानंतर आरोपीने दुचाकीवरून पलायन केले आहे. तो मोबाईल वापरत नसल्याने पोलिसांना त्यांचे लोकेशन मिळत नाही. यामुळे तपास करण्यात अडथळे निर्माण होत असल्याची माहिती आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील यांनी याप्रकरणी लक्ष घातल्याने नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील पारनेर पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत.

वडझिरे गोळीबार प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. घटना घडल्यापासून मी याप्रकरणी पारनेरमध्ये लक्ष ठेवून आहे. आरोपीच्या शोधासाठी पारनेर पोलिसांची दोन व स्थानिक गुन्हे शाखेची चार अशी सहा पथके आरोपीच्या शोधासाठी कार्यरत आहेत. आरोपी अजून सापडलेला नसून त्याचा कसून शोध घेत आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.
-अजित पाटील, (उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com