नगरच्या शिलेदारांनीही गाजवली ‘संयुक्त महाराष्ट्र’ची चळवळ
Featured

नगरच्या शिलेदारांनीही गाजवली ‘संयुक्त महाराष्ट्र’ची चळवळ

Sarvmat Digital

आव्हाड, नागवडे, भापकर, खाकाळ, म्हस्के यांचा मुंबईच्या आंदोलनात सहभाग

अहमदनगर- 1955 साली मुंबईत सुरु झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने नगर तालुक्यातील अनेक तरूण प्रभावीत झाले. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे ही चळवळ थेट नगर तालुक्यापासून मुंबई-दिल्लीपर्यंत धडकली. मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती होण्यासाठी नगर तालुक्यातील अनेकांनी आपला खारीचा वाटा उचलत ही चळवळ खेडोपाडी नेली. सत्याग्रह, मोर्चे, निदर्शने या मार्गाचा अवलंब करत 1 मे 1960 ला ही चळवळ यशस्वी झाली. ज्यांनी यात मोलाचे योगदान दिले त्यातील काही मोजकेच मानकरी आजमितीला हयात आहेत.

देश स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र व गुजरात मिळून द्विभाषिक प्रांत झाला होता. मुंबईसह महाराष्ट्र वेगळे राज्य असावे यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरला होता. एस. एम. जोशी, भाई डांगे, आचार्य अत्रे यांनी या चळवळीची धुरा सांभाळत जनजागृती सुरु केली. वर्तमानपत्रातून चळवळीविषयी लिखाण प्रसिद्ध होत. त्याचे पडसाद खेडोपाडी पसरू लागले. शिकलेली मंडळी लिखाण वाचून अंतर्मुख होऊन विचार करू लागली. नगर तालुक्यात कॉ. नामदेवराव आव्हाड (पांगरमल), कॉ. बाळासाहेब नागवडे (गुणवडी) चिमाजी खाकाळ (रूई छत्तीशी) दादा पाटील भापकर (राळेगण म्हसोबा), गोविंदराव अमृते (वाटेफळ), कुंडलिकराव घीगे (वडगाव तांदळी), संपतराव रणसिंग (तांदळी),

जगन्नाथ पाटील दळवी (सोनेवाडी), बन्सिभाऊ म्हस्के (टाकळी काझी), अनंतराव जाधव (अकोळनेर), रावसाहेब जाधव, गिरधरलाल चौधरी (चिचोंडी पाटील), जगन्नाथराव सोनवणे (हिंगणगाव) या सारख्या त्यावेळच्या तरूण व राष्ट्र प्रेमाने भारावलेल्या मंडळींनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उडी घेतली.

जिल्ह्यात या चळवळीचे नेतृत्व बापूसाहेब भापकर, कॉ. पी. बी. कडू पाटील, एकनाथराव भागवत, भास्करराव औटी, बाबूजी आव्हाड, कुमार सप्तर्षी, राम दसरे अशा मंडळीकडे होते. नगर तालुक्यातून नामदेवराव आव्हाड, बाळासाहेब नागवडे ही मंडळी जिल्ह्यातील नेत्याशी समन्वय ठेऊन ग्रामीण भागात जनजागृती करीत होती. गावोगावी बैठका घेऊन चळवळीची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्याचे काम मानकरी करत. याचा प्रभाव इतका वाढत गेला की खेड्यापाड्यात मोर्चे व सत्याग्रह सुरु झाले. चळवळीची व्यापकता वाढवण्यात नगर तालुक्याने मोलाचे काम केले.

तालुक्यात बन्सीभाऊ म्हस्के यांच्यासारखी काही मोजकेच या घटनांचे साक्षीदार हयात आहेत. सन 1956-57 च्या काळात मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे मोठी सभा भरली होती. तालुक्यातील चळवळीचे सारे मानकरी यावेळी मुंबईला गेले होते. घोषणांनी अवघी मुंबई हादरली. यावेळी झालेल्या गोळीबारात सुमारे सव्वाशे कार्यकर्ते हुतात्मे झाले. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात हजारो जखमी झाले.

यावेळी झालेली पळापळ आणि घोषणाबाजीची आठवण चळवळीतील हयात असणार्‍या शिलेदारांना अजून ताजी वाटते. यानंतर प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पंडीत नेहरू आले होते. त्यांच्यासमोर संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी तालुक्यातील शिलेदार जमले होते. यावेळी मोठी घोषणाबाजी झाली. दिल्लीत संसद भवनासमोर झालेल्या निदर्शनात बाळासाहेब नागवडे सहभागी झाले होते. यावेळी रात्रभर ठिय्या मांडण्यात आला. रात्रभर थंडीत कुडकुडत निदर्शक ठाण मांडून होते. याची आठवण नागवडे नेहमी सांगत असे. 1 मे 1960 ला ही चळवळ अखेर यशस्वी झाली.

बेळगावचेशल्य आजही
साधारण 1955-56 चा काळ आजही आठवतो. नगर तालुक्यातील अनेक मंडळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रभागी होती. त्यावेळी त्या नेत्यांच्या मागे आम्ही तरूण मंडळी चळवळीचे काम् करत होतो. मुंबई मोर्चा, आंदोलन, गावोगावी बैठकाद्वारे जनजागृती केली. लाठीमारही सोसला. आमची चळवळ यशस्वी झाली, पण बेळगाव महाराष्ट्रात राहिले नाही याचे मोठे दुःख आजही आम्हाला कायम आहे. आज बरीच मंडळी हयात नाहीत. पण 1 मे ला त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
– बन्सीभाऊ म्हस्के, चळवळीतील कायर्कर्ते.

Deshdoot
www.deshdoot.com