टंकलेखन परीक्षेचे मूळ परीक्षार्थी सापडेना !
Featured

टंकलेखन परीक्षेचे मूळ परीक्षार्थी सापडेना !

Sarvmat Digital

नगर तालुका पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी विषयाच्या टंकलेखन परीक्षेत नगरमध्ये डमी विद्यार्थी बसल्याचा प्रकार मागील महिन्यांमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात डमी म्हणून बसलेल्या चौघांना व एका मूळ परीक्षार्थीला तालुका पोलिसांनी अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असले तरी तीन खरे परीक्षार्थी अद्याप फरार असून त्याच्या तपासाच्या कार्यप्रणालीवर आणि तालुका पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्हे उपस्थित होताना दिसत आहेत.

मागील महिन्यांत नगर शहराजवळील नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथील केंद्रावर मराठी विषयाची टंकलेखन परीक्षा सुरू होती. या केंद्रावर संचालक म्हणून जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी जयश्री कार्ले या कार्यरत होत्या. परीक्षा हॉलमध्ये काही विद्यार्थी संशयास्पद हालचाली करत होते. त्यावेळी कार्ले यांनी या विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासले. त्याचबरोबर स्वाक्षरीपट देखील तपासला. यात चार विद्यार्थी परीक्षेला डमी आढळले. कार्ले यांनी विद्यार्थ्यांना विचारणा केल्यावर त्यांनी कार्ले यांना अरेरावीची भाषा वापरली.

याप्रकरणी कार्ले यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यात संतोष मारूती चौरे (रा. पाईपलाईन रोड), आदीनाथ नामदेव सोलट, नवनाथ नामदेव सोलट (रा. मिरी, ता. पाथर्डी), युवराज रामदास सुळे (रा. पाटोदा, जि. बीड), मयुर चंद्रकांत घोडके (रा. नगर) यांना अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, मूळ परीक्षार्थी असलेले मोरेश्वर दिलीप गीते, तेजस जालिंदर बोरुडे, प्रवीण अर्जुन गाडेकर (रा. नगर) अद्याप पसार आहेत.

नगर शहरामध्ये टंकलेखनाचे अनेक केंद्र आहे. या केंद्रामध्ये दर सहा महिन्यांला हजारो विद्यार्थी टंकलेखन शिकण्यासाठी प्रवेश घेतात. केंद्र चालकाकडून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून देण्याची हमी देण्यात येते. असाच प्रकार गेल्या महिन्यांत झाला. केंद्र चालकच विद्यार्थ्यांला पास करून देण्यासाठी पैसे घेऊन स्वत: परीक्षेसाठी बसले. केंद्र संचालकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांचा भंडाफोड केला.

यामुळे पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करणे आवश्यक आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. 15 दिवसांनंतर देखील परीक्षेतील मूळ परिक्षार्थी पोलिसांना सापडत नाहीत. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग, राज्य परीक्षा आयोग यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. परंतु त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. तसेच पोलिसांनी सखोल तपास करून सत्य बाहेर आण्यसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. परंतु, तीन आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने त्यांच्या कार्यक्षमता व कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मोठ्या रॅकेटची शक्यता
टंकलेखन परीक्षेत विद्यार्थ्यांना पास करून देण्यासाठी स्वत: केंद्र चालक परीक्षेला डमी म्हणून बसले होते. दर सहा महिन्यांला मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांच्या टंकलेखन परीक्षा घेतल्या जातात. अनेकांना फक्त प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने प्रत्यक्षात सराव न करता पास करून प्रमाणपत्र मिळाले तरी चालेल यासाठी केंद्र संचालक विद्यार्थ्यांना पास करून प्रमाणपत्र मिळवून देण्याची हमी देतात. यामुळे टंकलेखन परीक्षेच्या परीक्षेत पास करून देणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात कार्यरत असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही.

Deshdoot
www.deshdoot.com