भावकीत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी
Featured

भावकीत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी

Sarvmat Digital

शेतातील चार्‍यावरून कारथळवाडीतील घटना; परस्परविरोधी फिर्यादी दाखल

तळेगाव दिघे (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील कारथळवाडी येथे शेतातील चार्‍यावरून भावकीतील दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वापाच ते रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान घडली. हाणामारीत कुर्‍हाडीचा दांडा, फावडी, गज, दगड, पाईप या साहित्यांचा वापर करण्यात आला असून याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीवरून 13 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मेंढवण परिसरातील कारथळवाडी याठिकाणी रमजान बाबुलाल पठाण हे शेतकरी राहतात. शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास बुढन जमादार पठाण, लतिफ जमादार पठाण, यासीन जमादार पठाण, मुन्नाबी बुढन पठाण, हसिना लतिफ पठाण, तन्वीर यासीन पठाण यांनी एकत्र येऊन रमजान यांचे वडील बाबुलाल जमादार पठाण यांस म्हणाले की, आम्ही तुमचा चारा नेला नाही. त्यामुळे तुम्ही आमच्या नावाची वाच्यता का करता असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आले.

त्यावेळी लैलाबी बाबुलाल पठाण व यास्मीन जुबेर पठाण हे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी व कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण केली. यास्मीन पठाण या भांडणाची शुटिंग मोबाईलवरून काढत असतांना त्याचवेळी तनवीर पठाण याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पुन्हा आमच्या नादी लागलात तर जीवे मारुन टाकू अशी धमकी दिली. याप्रकरणी रमजान बाबुलाल पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध भा.दं.वि. कलम 326, 324, 327, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसर्‍या घटनेत बुढण जमादार पठाण हे शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शेतातील ज्वारीचा कडबा आणण्यासाठी गेले असताना त्याचवेळी बाबुलाल जमादार पठाण, लैलाबी बाबुलाल पठाण, जुबेर बाबुलाल पठाण, रमजान बाबुलाल पठाण, आस्मना बाबुलाल पठाण, यास्मीन जुबेर पठाण, ऋषिकेश गणपत बर्डे यांनी एकत्र येत म्हणाले की, तुम्ही येथे कशाला आले. हे शेत आमचे आहे असे म्हणून या सर्वांनी बुढण पठाण यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व फावड्याने पाठीवर मारहाण केली. यासीन जमादार पठाण, लतीफ जमादार पठाण यांना पोटात व पाठीत फावड्याने मारहाण केली.

लैलाबी बाबुलाल पठाण हिने शिवीगाळ करुन दमदाटी केली तसेच मुन्नाबी बुढण पठाण व हसीन लतीफ पठाण यांना दगड फेकून मारहाण केली. याप्रकरणी बुढण जमादार पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात वरील सात जणांविरुद्ध भा.दं.वि. 326, 324, 337, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विष्णू आहेर व पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर अधिक तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com