ट्विटरवर आलेली मागणी जिल्हाधिकार्‍यांकडून पूर्ण
Featured

ट्विटरवर आलेली मागणी जिल्हाधिकार्‍यांकडून पूर्ण

Sarvmat Digital

आईसाठी औषधे देण्याच्या मुकुंदनगरमधील तरूणाच्या हाकेला द्विवेदी धावले

अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊनच्या काळात आजारी आईच्या औषधांसाठी महापालिकेच्या हेल्पलाइनला फोन लावूनही हेल्पलाइन व्यस्त असल्याने मुकुंदनगर येथील एका तरुणाने थेट जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे ट्विटरवरून संपर्क साधत औषधांची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही लगेचच त्याला प्रतिसाद देत अवघ्या तासाभरातच प्रशासकीय यंत्रणेमार्फत संबंधित तरूणापर्यंत औषधांचा पुरवठा केला. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दाखवलेली ही तत्परता सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे.

नगर शहरातील मुकुंदनगरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट जाहीर केल्याने 10 एप्रिलपासून हा भाग सील करण्यात आला आहे. या भागातील अत्यावश्यक सेवेसह सर्व सेवा 14 एप्रिलपर्यंत (आज) बंद आहेत. येथील किराणा दुकाने, औषध दुकाने व अन्य दुकानेही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे या भागांतील दैनंदिन गरजांच्या पूर्ततेची जबाबदारी महापालिकेवर देण्यात आली आहे.

त्यानूसार महापालिकेने अत्यावश्यक सेवांची मागणी नोंदविण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक दिले आहेत. या हेल्पलाइन क्रमांकावर औषधासाठी मुकुंदनगर येथील रहिवासी शाहरूख सिद्दीकी हे रविवारी सायंकाळी संपर्क करीत होते. जवळपास दोन तास संपर्क करून देखील हेल्पलाइन बिझीच येत होती. अखेर सिद्दीकी यांनी रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी आपल्या अडचणीबाबत ट्विट करीत ते ट्विट जिल्हाधिकारी द्विवेदी यांना टॅग केले.

द्विवेदी यांनीही तातडीने ट्विटची दखल घेऊन त्वरित प्रतिसाद देत औषधाचे प्रिस्क्रिप्शन मागितले व संबंधित औषधे प्रशासकीय यंत्रणेमार्फत सिद्दीकी यांच्यापर्यंत पोहचवली. मनपाची हेल्पलाइन व्यस्त येत असल्याने ट्विटरच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधला. जिल्हाधिकार्‍यांनी त्याची दखल घेतली व प्रशासकीय सेवेमार्फत पुढील एक तासात औषधे पोहच झाली.

लॉकडाऊनमध्ये प्रशासन संवेदनशील
नगर शहरातील मुकूंदनगर, आलमगीर आणि जिल्ह्यात अन्य दोन ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहेत. या ठिकाणी अत्यावश्यक सेवांची दुकाने बंद आहेत. तसेच इतरत्र सर्वत्र लॉकडाऊन लागू असले तरी प्रशासन या काळात देखील संवेदनशील आहे. या लॉकडाऊनचा काही लोकांना त्रास होत असला तरी अडचणीच्या काळात होणारी मदतीची मागणी लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणेतील शेवटच्या व्यक्ती मदतीस तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी ‘सार्वमत’बरोबर बोलतांना सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com