Thursday, April 25, 2024
Homeनगरसंस्थानने यापूर्वीची गृहकर्ज व्याज सवलत योजना सुरू ठेवावी

संस्थानने यापूर्वीची गृहकर्ज व्याज सवलत योजना सुरू ठेवावी

साई संस्थान कर्मचारी वेल्फेअर संघटनेच्या वतीने आ. राधाकृष्ण विखे यांचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन

शिर्डी (प्रतिनिधी)- साईबाबा संस्थान कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे सर्व शासकीय सुविधा सध्या संस्थानमार्फत पुरविण्यात येत नाहीत. त्यामुळे संस्थानमार्फत पूर्णपणे जोपर्यंत सर्व शासकीय सोयी सुविधा लागू होत नाहीत तोपर्यंत शासनाची गृहकर्ज अग्रीम योजनेची अंमलबजावणी स्थगित ठेवून संस्थानची पूर्वीची गृहकर्ज व्याज सवलत योजना सुरू ठेवण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल्फेअर संघटनेच्या वतीने आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहे.

- Advertisement -

संस्थानच्या स्थायी पदावरील काही कर्मचार्‍यांना संस्थानमार्फत यापूर्वी निवास व्यवस्था पुरविण्यात आलेली आहे. तसेच संस्थानकडे निवास व्यवस्था उपलब्ध नसल्याने या कर्मचार्‍यांना यापूर्वी संस्थानमार्फत निवास व्यवस्था पुरविणे शक्य नाही अशा कर्मचार्‍यांसाठी संस्थान प्रशासनाने संस्थानमार्फत गृहकर्ज व्याज सवलत योजनेचा लाभ दिलेला आहे. या योजनेत बँकेच्या प्रचलित व्याजदराची निम्मी रक्कम संस्थानमार्फत व निम्मी रक्कम कर्मचारीमार्फत अदा केली जाते. या योजनेचा संस्थानमधील बर्‍याचशा कर्मचार्‍यांनी लाभ घेतलेला आहे.

साईबाबा संस्थानमार्फत सध्या सुरु असलेली गृहकर्ज व्याज सवलत योजनेला स्थगित करुन नव्याने राज्यशासित कर्मचार्‍यांना लागू असलेली गृहकर्ज अग्रीम रक्कम योजना सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे. या योजनेत संस्थानमार्फत मिळणारी निम्मी व्याजाची सवलत बंद होऊन बँकेच्या प्रचलित दराप्रमाणे व्याजाची रक्कम कर्मचार्‍यांना भरावी लागत आहे.

तरी संस्थानने जोपर्यंत सर्व शासकीय सोयी सुविधा लागू होत नाही तोपर्यंत शासनाची गृहकर्ज अग्रीम योजनेची अंमलबजावणी स्थगित ठेवून संस्थानची पूर्वीची गृहकर्ज व्याज सवलत योजना सुरु ठेवण्यात यावी. तसेच नवीन शासकीय गृहकर्ज अग्रीम योजनेस आमच्या संघटनेची हरकत असल्याची या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी संघटनेचे चेअरमन यादवराव कोते, प्रतापराव कोते, नितीन कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव, बाबुराव खाडगीर, मच्छिंद्र औताडे, प्रकाश अभंग, संताजी वाणी, सतीश धनवटे, सुभाष खंडागळे, संजय भडकवाड, नवनाथ जाधव, रवींद्र सुरळे, प्रल्हाद मुसंगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या