इंदोरीकर महाराजांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा
Featured

इंदोरीकर महाराजांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा

Sarvmat Digital

तृप्ती देसाई : अन्यथा अधिवेशनात गोंधळ घालू

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी कीर्तनातून महिलांचा अपमान केला आहे. त्यांच्याविरोधात पीसीपीएनटीडी कायद्यानुसार तत्काल गुन्हा दाखल करावा, अन्यथा येणार्‍या अधिवेशनात गोंधळ घालल्यात येईल असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

इंदोरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी तृप्ती देसाई मंगळवारी नगरमध्ये आल्या होत्या. त्यावेळी देसाई यांना सुप्याजवळ काही वारकर्‍यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. नगरमध्ये आल्यानंतर देसाई यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन इंदोरीकर महाराजांविरोधात लेखी तक्रार दिली. त्यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

येत्या दोन-तीन दिवसांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर आम्ही त्यांच्या आश्रमात जाऊ असे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री, अनेक मंत्री, काही राजकारणी मंडळी इंदोरीकर महाराजांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांने हे बंद करावे, अन्यथा त्यांनाही मंत्रालयात कोंडून घेऊन अद्दल घडवू, असं त्या म्हणाल्या. इंदोरीकर महाराज महिलांबद्दल जे काही बोलत आहेत, त्याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिले आहेत, त्यावर कारवाई व्हावी.

आम्हाला नगरमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. प्रत्यक्षात कुणीही आडवे आले नाही. अडविणार म्हणणारे कार्यकर्ते विकत घेतले असावेत. त्यांचा काही तरी लाभ होत असावा, त्यामुळे ते आमचा विरोध करीत आहेत. दिलगिरी व्यक्त करणारे पत्रक काढून उपयोग नाही.

सम-विषमचा वाद मागे घेऊन महिलांची लेखी माफी मागावी असेही मागणी देसाई यांनी केली. दरम्यान, इंदोरीकर महाराजांना नोटीस पाठवली आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी योग्य पावलं उचलली जातील. कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे, अशी माहितीही देसाई यांनी यावेळी दिली.

विनाकारण स्टंटबाजी करू नका : आ. लहामटे
इंदोरीकर महाराज यांच्या बद्दल सुरू असलेला वाद हा निरर्थक आहे. कोणाला तरी फोकसमध्ये यायचे आहे, त्यामुळे त्यांनी विनाकारण स्टंटबाजी करू नये, असा टोला राष्ट्रवादीचे आ. किरण लहामटे यांनी तृप्ती देसाई यांना लगावला. नगरमध्ये आ. लहामटे पत्रकरशी बोलत होते. इंदोरीकर महाराज यांच्यावर माफी मागावी, यासाठी दबाब का टाकला जात आहे? असा सवाल करत, महाराज यांना काळे फासण्याचा इशार्‍यातून काय साध्य करायचं आहे?. यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार आहे. महाराज यांना काळे फासण्याची भाषा त्यांनी करू नये, असे आ. लहामटे म्हणाले.

स्मिता आष्टेकर सुप्यात पोलिसांच्या ताब्यात

सुपा (वार्ताहार) – निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादळामुळे तृप्ती देसाई मंगळवारी नगरला येऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून महाराजांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देणार होत्या. त्याअगोदर समाजमाध्यमातून शिवसेनेच्या नेत्या स्मिता आष्टेकर व तृप्ती देसाई यांचे ऐकमेंकीना आव्हान देणारे व्हिडिओ प्रसारीत झाले होते. त्या दोघीत चांगलेच वाकयुद्ध रंगले होते. आष्टेकर यांनी देसाई यांना जिथे दिसेल तिथे धरुन मारण्याची भाषा केली होती. तर, देसाई यांनीही ते आवाहन स्वीकारून मी कुठेही यायला तयार आहे असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी तृप्ती देसाई नगरला येणार असल्याचे समजताच आष्टेकर आपला मोबाईल बंद ठेवून सुपा टोलनाका आल्या. त्याच्या मागावर असलेल्या भिंगार कॅम्प, सुपा पोलिसानी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले व देसाई यांना तक्रार देऊईपर्यंत सुपा पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. यावेळी बोलताना आष्टेकर म्हणाल्या, देसाई जाणूनबुजून आमच्या धर्माला बदनाम करत आहे. अलीकडील काळात महिलांवर कितीतरी अत्याचाराच्या घटना घडल्या. तेव्हा देसाई कुठे गेली होती असा सवाल आष्टेकर यांनी यावेळी केला.

Deshdoot
www.deshdoot.com