ट्रम्प यांच्या दौर्‍यावरून राजकारण तापले
Featured

ट्रम्प यांच्या दौर्‍यावरून राजकारण तापले

Sarvmat Digital

प्रियंका गांधी-संबित पात्रा यांच्यात शाब्दिक चकमक

नवी दिल्ली – येत्या 24 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर दाखल होत आहेत. ट्रम्प यांच्या या दौर्‍याची पंतप्रधान नरेंद्र मोदीही विशेष काळजी घेताना दिसत आहेत. ट्रम्प भारताच्या दौर्‍यावर येण्यापूर्वी देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांच्या अहमदाबाद येथील कार्यक्रमासाठी एका समितीद्वारे खर्च करण्यात येत असलेल्या 100 कोटी रुपयांवर काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

यावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्रम्प यांच्या स्वागतासाठी खर्च करण्यात येत असलेल्या पैशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी ट्विट करून म्हटले, राष्ट्रपती ट्रम्प यांच्या आगमनावर 100 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र हा पैसा एका समितीद्वारे खर्च होत आहे.

समितीच्या सदस्यांना देखील ठावूक नाही की ते त्या समितीचे सदस्य आहेत. या समितीला कोणत्या मंत्रालयाने किती पैसे दिले हे माहित करून घेण्याचा हक्क जनतेला नाही का, असा सवाल प्रियंका यांनी केला, तसेच समितीच्या आडून सरकार काय लपवत आहे, असंही त्यांनी विचारले आहे.

यावर भाजपने कडक शब्दांत उत्तर दिले आहे. ट्रम्प यांचा भारत दौरा जगातील सर्वात जुन्या लोकशाहीशी हितगुज आहे. अशा स्थितीत काँग्रेसला आनंद का होत नाही. जागतीक पातळीवर देशाची प्रतिष्ठा वाढत असूनही काँग्रेस खुश नसल्याचे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले.

ट्रम्प यांचा दौरा भारत-अमेरिका यांच्यातील संबंधासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेसने चिंता न करता देशाच्या गौरव वाढतोय अभिमान वाटू द्यावा, असा सल्ला संबित पात्रा यांनी दिला. तसेच खुद्द ट्रम्प यांनी अनेकदा भारत व्यवहारात फारच चिकाटीने वागतो, असं म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसने देशाची चिंता करणे सोडावे, असंही पात्रा यांनी स्पष्ट केले.

Deshdoot
www.deshdoot.com