Wednesday, April 24, 2024
Homeनगरट्रकचालकांना लुटणारी राहुरीची टोळी गजाआड

ट्रकचालकांना लुटणारी राहुरीची टोळी गजाआड

एलसीबीची कारवाई । तिघांना अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर-मनमाड महामार्गावरील गुहा गावाच्या शिवारात ट्रक चालकाला मारहाण करून लुटणार्‍यांना स्थानिक गुन्हे शाखेला पकडण्यात यश आले आहे. संतोष राजेंद्र विधाते (वय 24), सागर सिताराम विधाते (वय 30), आप्पासाहेब केशव वाडकर (वय 30, सर्व रा. वरशिंदे, ता.राहुरी) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

21 एप्रिलला पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सातार्‍याला जात असताना ट्रक पंक्चर झाल्याने पंक्चर काढण्यासाठी नगर-मनमाड मार्गावरील गुहा गावाच्या शिवारात साई गंगा हॉटेलजवळ ट्रक थांबवला. या दरम्यान, मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञातांनी दमदाटी करून जवळील रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 15 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेल्याची फिर्याद राहुरी पोलिस ठाण्यात ट्रकचालक विशाल श्रीराम वाडेकर (रा. मोहाडी पिंपळादेवी, जि. धुळे) यांनी दिली होती.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, हा गुन्हा संतोष विधाते याने व त्यांच्या साथीदारांनी मिळून केला आहे, अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार राहुरी येथे जाऊन शोध घेऊन आरोपी संतोष विधाते याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. संतोष याला विचारणा केली असता, त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसी खाक्या दाखविताच, सदरचा गुन्हा हा साथीदार सागर विधाते व आप्पासाहेब वाडकर सर्वांनी केल्याची कबुली दिली. यानंतर उर्वरित सागर सिताराम विधाते (वय 30), आप्पासाहेब केशव वाडकर (वय 30 दोघे रा.वरशिंदे, ता.राहुरी) याचा शोध घेऊन पकडण्यात आले.

यावेळी चोरलेली रक्कम खर्च केल्याचे आरोपींनी सांगितले, 5 हजार रुपयाचा एम आयचा मोबाईल, स्पलेंडर गाडी (एमएच 17 एआर 3334) असा एकूण 35 हजार रु. मुद्देमाल हस्तगत केला. पकडण्यात आलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या