दत्तनगरच्या तिघा संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह
Featured

दत्तनगरच्या तिघा संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Sarvmat Digital

मुंबई, नाशिक, औरंगाबादचे पंधराजण क्वॉरंटाईन

टिळकनगर (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात मुंबईहून आलेल्या पाच जनांपैकी करोनाच्या संशयित तीन रुग्णाचे तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह निघाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी दिली आहे. तर इतर दोघांना श्रीरामपूर येथे क्वॉरंटाईन करण्यात आले असून, ग्रामपंचायत प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता.

रुग्णाच्या स्त्राव नमुने पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. स्त्राव नमुने चाचणीनंतर लॅबने रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यासह दत्तनगर परिसरातील लोकांसाठी दिलासादायक बाब आहे.

करोनाचा संशयित रुग्ण सापडल्याने श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली होती. तर संपूर्ण जगभरात दहशत निर्माण करणार्‍या करोना व्हायरसने ग्रामीण भागांतही प्रवेश केला, अशी चर्चा सुरू झाली होती. या संशयितांना नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुण्यातील लॅबमधून संशयित रुग्णाच्या घशाच्या स्त्राव नमुन्याचे अहवाल आल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला असूूून, रुग्णाना करोनाची लागण झाली नसून प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे समजते .

श्रीरामपूर तालुक्यात बाहेरच्या जिल्ह्यांमधून नागरिकांचे येणे सुरूच आहे. त्यात दत्तनगरमध्ये आतापर्यंत बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह पंधरा नागरिकांना येथील डी.पॉल शाळेत क्वॉरंटाईन केले आहे. परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी गावांतील विविध भागांत जाऊन कोरोना संदर्भात वेळोवेळी जनजागृती करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com